scorecardresearch

राहुल गांधींच्या ब्रिटनमधील ‘त्या’ विधानानंतर विरोधक आक्रमक, खासदारकी रद्द करण्याची मागणी!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये भारतीय लोकशाही, मोदी सरकारवर केलेल्या भाष्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

rahul gandhi
राहुल गांधी (संग्रहित फोटो)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये भारतीय लोकशाही, मोदी सरकारवर केलेल्या भाष्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेची तसेच देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपाने केली आहे.

हेही वाचा >>> Karnataka Election: मंड्या येथील पंतप्रधान मोदींच्या मिरवणुकीमुळे भाजपात जोष; हिंदुत्वाच्या मुद्द्याची धार कमी करण्याची सूचना

विशेष समितीची स्थापना करण्याची मागणी

भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संसदेत बोलू दिले जात नाही, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. राहुल गांधी यांच्या याच विधानाची भाजपाने दखल घेतली आहे. खासदार राहुल गांधी यांना सभागृहातून निलंबित करावे. या कारवाईच्या शक्यतेवर अभ्यास करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करावी, अशी मागणी भाजपाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>> उत्तराखंड राज्याची जन्मकथा; ज्याच्या उत्तरकळा आजही राज्याला जाणवतात

ओम बिर्ला यांनी भाजपाची मागणी मान्य करत विशेष समितीची स्थापना केल्यास या समितीत भाजपाच्या नेत्यांचा अधिक समावेश असण्याची शक्यता आहे. या समितीकडून राहुल गांधी यांनी केलेले विधान तसेच त्यांच्यावरील कारवाईची शक्यता कायद्याच्या कसोटीवर तपासली जाईल. त्यानंतर महिन्याभरात ही समिती आपला अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर करेल.

काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे, यात आम्हाला रस नाही, पण…

भाजपाने केलेल्या या मागणीवर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाची भाजपाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीरपणेच हाताळले गेले पाहिजे, असे आम्हाला वाटते. देशाशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट आपल्या सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे. काँग्रेसमध्ये सध्या काय सुरू आहे, यात आम्हाला रस नाही. मात्र राहुल गांधी यांनी देशाचा अपमान केलेला आहे. त्यामुळे आम्ही शांत बसू शकत नाहीत,” असे रिजिजू म्हणाले.

हेही वाचा >>>Karnataka Election 2023 : तिकीट मिळवण्यासाठी भाजपामध्ये चढाओढ; विद्यमान मुख्यमंत्री बोम्मई यांच्या उमेदवारीबाबतही संभ्रम?

सभागृहाचीही प्रतिमा मलिन झाली आहे

“भारताविरोधी बोलणाऱ्या लोकांप्रमाणेच राहुल गांधी यांची भाषा आहे. राहुल गांधी यांनी भारताची प्रतीमा मलीन केली आहे. यासह ते ज्या सभागृहाचे सदस्य आहेत, त्या सभागृहाचीही प्रतिमा मलिन झाली आहे,” असा आरोपही रिजिजू यांनी केला.

दरम्यान, राहुल गांधी यांनी मी माफी मागणार नाही, असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. मी कोणतेही देशविरोधी विधान केलेले नाही. मला संधी दिली, तर तेच विधान मी संसदेतही करेन, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 18:06 IST
ताज्या बातम्या