scorecardresearch

Karnataka Election: मंड्या येथील पंतप्रधान मोदींच्या मिरवणुकीमुळे भाजपात जोष; हिंदुत्वाच्या मुद्द्याची धार कमी करण्याची सूचना

भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना लव्ह जिहाद, येडियुरप्पा यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्ये थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेत प्रचारावर भर देण्यात येईल.

PM Narendra Modi Rally in Mandya
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मांड्या, कर्नाटक येथील मिरवणुकीला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटक दौऱ्यात मंड्या येथे झालेल्या (दि. १२ मार्च) मिरवणुकीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जनता दल (एस) पक्षाचा किल्ला असलेल्या या भागात मोदींची लोकप्रियता दिसून आली. त्यामुळे मोदींच्या लोकप्रियतेचा कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात वापर करण्यावर भाजपाचा भर असणार आहे. दिल्लीमधील वरिष्ठ भाजपा नेत्याने सांगितले की, हिंदुत्वाच्या मुद्द्याची धार कमी करण्याचे आणि वादग्रस्त विधाने टाळण्याचे निर्देश कर्नाटकातील नेत्यांना देण्यात आले आहेत. याचा आतापर्यंत पक्षाला फारसा लाभ झाला नसल्याचे दिसले. भाजपा नेत्याने पुढे सांगितले की, काँग्रेस आणि भाजपाचा मतदारवर्ग एकच आहे. त्यामुळे मजबूत आणि लोकप्रिय नेताच महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

कर्नाटकाचे प्रदेश सचिव अरुण सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, मंड्या येथे भाजपाची पक्ष संघटना तेवढी बळकट नाही. पण लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आणि त्यांनी मोदींना अभिवादन केले. अशाच प्रकारची गर्दी बेळगाव आणि शिवमोग्गा येथेही पाहायला मिळाली. त्यावरून भाजपाच्या बाजूने राज्यात वातावरण असल्याचे स्पष्ट दिसते.

हे वाचा >> मोदी सरकारचा नववा वर्धापन दिन; मोदींची लोकप्रियता आणि विकासकामांच्या जाहिराती केल्या जाणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नेत्यांमधील कुरबुरीची दखल केंद्रीय नेतृत्वानेदेखील घेतली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांनी काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र याला तिकीट देण्याच्या विषयावर भाष्य केले होते. रवी म्हणाले की, विजयेंद्र यांना तिकीट द्यायचे की नाही हे पक्षाचे राष्ट्रीय नेते ठरवतील. याचा निर्णय येडियुरप्पा यांच्या प्रभावाखाली होऊ शकत नाही. रवी यांनी हे वक्तव्य जाहीरपणे केले नव्हते, असेही सूत्रांनी सांगितले. येडियुरप्पा हे लिंगायत समुदायाचे मोठे नेते मानले जातात. या समुदायात त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे पक्षात त्यांचे चांगले वजन आहे.

कर्नाटकमधील काही भाजपा नेत्यांनी केंद्रीय आणि राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या नको त्या वक्तव्यांवर आक्षेप घेतला आहे. या नेत्यांची वक्तव्ये पक्षाला मागे खेचण्याचे काम करतात, असाही त्यांचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतील यांनीही काही दिवसांपूर्वी कर्नाटकची निवडणूक ही टिपू सुलतान विरुद्ध विनायक दामोदर सावरकर यांच्यात असल्याचे म्हटले होते. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी रस्ते, गटारे अशा छोट्या मुद्द्यांकडे लक्ष न देता ‘लव्ह जिहाद’ प्रकार थांबविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे आवाहन केले होते. तसेच राहुल गांधी यांच्या लग्नाबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, कतील आणि इतर नेत्यांनी बोलताना जरा काळजी घ्यायला हवी.

कर्नाटक निवडणूक प्रभारी म्हणून भाजपाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नेमणूक केलेली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्यासह केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनादेखील निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. शुक्रवार (१७ मार्च) पासून हे नेते कर्नाटक राज्याचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ मार्च रोजी पुन्हा एकदा कर्नाटक राज्याचा दौरा करणार असून दावनगेरे येथे त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या पुढे-मागे कर्नाटक निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे वाचा >> Karnataka Election 2023 : बी एस येडियुरप्पांमुळे भाजपात अंतर्गत खदखद, पुत्र विजयेंद्र यांना तिकीट मिळणार?

मंड्या येथील सभा आणि मिरवणुकीमुळे प्रदेश भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारला आहे. जुन्या म्हैसूर प्रांतात वोक्कालिगा समुदाय बहुसंख्येने आहे. कर्नाटक विधानसभेतील २२४ जागांपैकी या भागातील ८० जागांवर वोक्कालिगा समुदायाचे प्राबल्य आहे. जनता दल (एस) येथील प्रमुख पक्ष असून भाजपाला या वेळी या भागातून यश मिळेल, अशी शक्यता वाटते. लिंगायत समाजाच्या मतांसोबतच प्रभाव नसलेल्या मागासवर्गीय जाती, दलित ज्यांना इथे अहिंडा म्हटले जाते, या जातींची मते मिळवण्याचाही भाजपाचा प्रयत्न असेल. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मागच्या काळात याच जातसमूहांचा पाठिंबा मिळवला होता.

कतील आणि रवी हे दोघेही भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संथोष यांचे निकटवर्तीय समजले जातात. संथोष हे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे स्पर्धक आहेत. त्यामुळे कतील आणि रवी यांच्या विधानांमुळे लिंगायत समाजातील मतदानावर परिणाम होऊ शकतो, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

कर्नाटकाची लोकसंख्या सहा कोटी आहे. यांपैकी लिंगायत समाज १७ टक्के, वोक्कालिगा १५ टक्के, मुस्लीम नऊ टक्के आणि कुरुबा समाज (सिद्धरामय्या हे कुरुबा आहेत) आठ टक्के आहे. कुरुबा वगळता मागासवर्गीय समाजाच्या अनेक जातींची लोकसंख्या जवळपास २५ टक्क्यांच्या घरात आहे. अनुसूचित जातींची लोकसंख्या १५ टक्के आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या तीन टक्के आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 13:47 IST