scorecardresearch

ज्या कोलारमधील भाषणामुळे खासदारकी रद्द झाली, त्याच ठिकाणी राहुल गांधींची पुन्हा जाहीर सभा; आता नवा आरोप काय लावणार?

ज्या कोलारमधील भाषणामुळे राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली होती, आता त्याच कोलारमध्ये ५ एप्रिल रोजी ते सभा घेत आहेत. त्यामुळे या वेळी पंतप्रधान मोदींच्या विरोधात ते काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे.

Rahul Gandhi speech in Kolar
काँग्रेस नेते राहुल गांधी

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक राज्यातील कोलारमध्ये २०१९ साली केलेल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. या टीकेमुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर खासदारकी रद्द करण्यात आली. आता राहुल गांधी पुन्हा एकदा याच कोलारमध्ये सभा घेणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना निवडणुकीच्या आधी ५ एप्रिल रोजी कोलार येथे सभा संपन्न होणार असल्यामुळे या सभेत राहुल गांधी आता पुन्हा काय बोलणार? याकडे काँग्रेस आणि भाजपाचे लक्ष लागले आहे.

तेच ठिकाण, तोच नेता, पुन्हा नवा आरोप?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी १३ एप्रिल रोजी कोलार येथील विश्वेश्वरय्या स्टेडियमवर सभेला संबोधित करत असताना राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वेळी त्यांनी कोलार जिल्ह्यातील मुलबगल येथे मिरवणूक घेतली होती आणि केजीएफ कॉर्पोरेशनच्या मैदानावरदेखील जाहीर सभा घेतली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी कोलारमध्ये सभा घेणार आहेत. यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे कर्नाटक प्रदेश कार्याध्यक्ष रामलिंगा रेड्डी म्हणाले की, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासमवेत लोक आहेत, हा संदेश देण्यासाठी ही जाहीर सभा अतिशय महत्त्वाची आहे. लोकशाहीचे मूल्य टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या जाहीर सभेला किमान एक लाख लोक उपस्थिती लावतील, असा आमचा प्रयत्न आहे. रामलिंगा रेड्डी हे या जाहीर सभेचे नियोजन करीत आहेत.

हे वाचा >> अग्रलेख : सोयीस्करतेची सवय!

सूरत न्यायालयाच्या शिक्षेविरूद्ध दाद मागितली नाही

राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावून एक आठवड्याचा काळ होत आला तरी अद्याप वरच्या न्यायालयात शिक्षेविरुद्ध दाद मागण्यात आलेली नाही. काँग्रेसच्या या खेळीमागे राजकारण असल्याचे सांगितले जात आहे. भाजपाला नामोहरम करण्यासाठी राहुल गांधी स्वतःवर कारवाई होऊ देतील, असा कयास यामधून दिसून येतो. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरातील अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांनी त्यांची पाठराखण केली होती. ज्यामुळे दुभंगलेला विरोधी पक्ष पुन्हा यानिमित्ताने एका सुरात बोलताना दिसला.

२०१९ साली कोलार सभेत राहुल गांधी काय म्हणाले?

२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील कोलार येथे बोलताना मोदी या आडनावावर टिप्पणी केली होती. “सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे असते?” असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर भाजपाचे आमदार आणि गुजरातमधील माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी आक्षेप घेत अब्रुनुकसानीचा दावा केला होता. भूपेंद्र पटेल यांच्या सरकारमध्ये पूर्णेश मोदी मंत्री होते. सध्या ते सूरत पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 10:41 IST

संबंधित बातम्या