काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या ट्रेडमार्क लुकपैकी एक म्हणजे त्यांची पांढर्‍या रंगाच्या टी-शर्टमधील साधी प्रतिमा. त्यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांचा हा ‘लुक’ प्रसिद्ध झाला. बुधवारी (१९ जून) त्यांनी आपल्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम सुरू केली. नीट आणि नेट या दोन्ही परीक्षांत अनियमितता आढळल्यामुळे देशभरातील विद्यार्थी संतापले आहेत. या पार्श्वभूमीवर निषेध म्हणून त्यांनी आपल्या समर्थकांना साधे पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट परिधान करण्याचे आवाहन केले.

‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम काय आहे?

‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केले, “तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. मला नेहमी विचारले जाते की, मी नेहमी पांढरा टी-शर्ट का परिधान करतो? यामागचे कारण म्हणजे माझ्यासाठी पंधरा टी-शर्ट पारदर्शकता, दृढनिश्चय व साधेपणाचे प्रतीक आहे. ही मूल्ये तुमच्या जीवनात मूल्ये कुठे आणि किती उपयुक्त आहेत? हे मला #WhiteTshirtArmy हा हॅशटॅग वापरून व्हिडीओमध्ये सांगा. सर्वांना खूप प्रेम.”

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश

राहुल गांधींनी लोकांना व्हिडीओ संदेशात #WhiteTshirtArmy हा हॅशटॅग वापरण्यास सांगितले आणि आपल्या जीवनातील या मूल्यांचे महत्त्व व्हिडीओतून स्पष्ट करण्यास सांगितले. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये प्रतिक्रियात्मक व्हिडीओ पाठविलेल्या प्रत्येकाला पांढरे टी-शर्ट देण्याचे आणि त्यावर आपली स्वाक्षरी देण्याचेही आश्वासन दिले.

मोहीम सुरू करण्याचा उद्देश काय?

विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) परीक्षा रद्द करण्यात आल्याने आणि नीट-यूजी २०२४ परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या कथित पेपर लीक प्रकरणामुळे देशातील तरुणाईमध्ये संताप आहे. पारदर्शकतेला मूळ पांढऱ्या रंगाशी जोडून, ​​या मोहिमेचा उद्देश पक्षासाठी संभाव्य मतदानाचा आधार तयार करणे हा आहे, असे वृत्त ‘न्यूज १८’ने दिले. असेच आवाहन पंतप्रधान मोदींनीही नमो अ‍ॅपच्या जाहिरातीसाठी केले होते. नमो अ‍ॅपची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून पंतप्रधान मोदींनी ‘मोदी शर्ट’ घालण्याचे आवाहन केले होते.

बेरोजगारी, दरवाढ, पेपरफुटी यांसारख्या समस्यांनी त्रासलेल्या तरुणांना एकत्र आणणे हाही ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम सुरू करण्याचा उद्देश आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या चांगल्या कामगिरीचे श्रेय राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दिले असल्याने, ‘व्हाईट टी-शर्ट’ मोहीम हा जनतेला जोडणारा आणि जनतेपर्यंत थेट पोहोचण्याचा योग्य मार्ग मानला जात आहे.

याव्यतिरिक्त काँग्रेसला आशा आहे की, शांततेचे प्रतीक असलेल्या पांढर्‍या रंगाचा वापर करून ते भाजपाच्या ‘भगव्या’ मोहिमेचा प्रभाव कमी करू शकतील. ‘न्यूज १८’च्या सूत्रांनुसार, राहुल गांधी यांच्याकडे गेल्या वर्षी ‘टी-शर्ट’ मोहिमेची संकल्पना होती. परंतु, नीट आणि नेट परीक्षांच्या अनियमिततेच्या विरोधात सुरू असलेल्या निषेधामुळे निवडणुकीच्या निकालानंतर ही मोहीम सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे, असे त्यांचे मत आहे.

राहुल गांधींचा पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यावरून आणि नीट परीक्षेच्या वादावरून हल्ला चढवला. ते म्हणाले, “मोदीजींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवले, असे बोलले जात होते. पण काही कारणास्तव, नरेंद्र मोदी भारतात पेपरफुटी थांबवू शकले नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत.” भाजपाच्या पालक संघटनेने शिक्षण व्यवस्थेवर कब्जा केल्यामुळे पेपर लीक होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : लोकसभेच्या अध्यक्षपदावरून ‘एनडीए’त मतभेद? कोण होणार लोकसभेचे नवीन अध्यक्ष?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जोपर्यंत ही व्यवस्था पूर्ववत होत नाही तोपर्यंत पेपरफुटी सुरूच राहणार आहे. ही एक देशविरोधी कृती आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात आलेली नाही; तर विशिष्ट संस्थेशी त्यांच्या संबंधच्या आधारावर करण्यात आली आहे. या संघटनेने आणि भाजपाने शिक्षण व्यवस्था कमकुवत केली आहे. नरेंद्र मोदींनी नोटबंदी करून अर्थव्यवस्थेसाठी जे केले, तेच आता शिक्षण व्यवस्थेसाठी केले आहे,” असे ते म्हणाले.