राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि भाजपाकडून पूर्ण ताकदीने प्रचार केला जात आहे. येथे काँग्रेस विरुद्ध भाजपा, अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४३ उमेदवारांची नावे असून, काँग्रेसने विद्यमान १५ आमदार व १५ मंत्र्यांना पुन्हा तिकीट दिले आहे. विशेष म्हणजे गहलोत सरकारला पाठिंबा देणाऱ्या पाच अपक्ष आमदारांनाही यावेळी काँग्रेसने तिकीट दिले आहे.

पहिल्या यादीत एकूण ४३ उमेदवारांची नावे

काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत एकूण ४३ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत काँग्रेसने १५ जागांवर विद्यमान आमदारांनाच तिकीट दिले आहे; तर १० मंत्री व चार राज्यमंत्र्यांना यावेळी काँग्रेसने पुन्हा एकदा संधी दिली आहे. सध्या भाजपाचे आमदार असलेल्या सात जागांसाठीही काँग्रेसने आपले उमेदवार या यादीत जाहीर केले आहेत. दुसऱ्या यादीत एकूण ४३ जागांपैकी फक्त रामगडच्या जागेवर विद्यमान आमदार शफिया झुबेर यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पती झुबेर खान यांना काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

२०० पैकी ७६ जागांवर काँग्रेसने उमेदवार केले जाहीर

याआधी काँग्रेसने शनिवारी ३३ जागांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली होती. म्हणजेच एकूण २०० जागांपैकी ७६ जागांसाठी काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचीच छाप दिसत आहे. २०२० साली गहलोत सरकार उलथवून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी गहलोत यांना साथ दिली. सप्टेंबर २०२२ मध्ये गहलोत यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवून, राजस्थानचे नेतृत्व सचिन पायलट यांच्याकडे सोपवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या हायकमांडकडून करण्यात आला होता. त्यावेळीही आमदारांनी गहलोत हेच मुख्यमंत्री हवेत, अशी भूमिका घेतली होती. कदाचित याच कारणामुळे गहलोत यांनी विद्यमान आमदार, तसेच मंत्र्यांना तिकीट मिळेल याची काळजी घेतलेली आहे.

बंड करणाऱ्या तीन नेत्यांना डच्चू?

राजस्थान काँग्रेसमध्ये २०२२ साली बंड झाले होते. या बंडाच्या मदतीने गहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता. या बंडाचे नियोजन करणाऱ्या तीन नेत्यांना अजूनही तिकीट मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यांना उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत स्थान मिळालेले नाही. मंत्री शांती धारिवाल मंत्री महेश जोशी व राजस्थान पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्र राठोड या तीन नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

कोणत्या मंत्र्यांना तिकीट मिळाले?

काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत १५ मंत्र्यांना तिकीट दिले आहे. त्यामध्ये बिकानेर पश्चिम मतदारसंघाचे बुलाकी दास कल्ला, गोविंद राम मेघवाल (खजुवाला), प्रताप सिंह खचारियावास (सिव्हिल लाइन्स), शकुंतला रावत (बानसूर), विश्वेंद्र सिंह (दीग कुम्हेर), रामलाल जाट (मंडल), भजनलाल जाटव (वैर), परसादी लाल (लालसोट), उदयलाल अंजना (निंबाहेडा), प्रमोद जैन भाया (अंता) यांचा समावेश आहे. याआधी आपल्या पहिल्या यादीत तीन मंत्र्याना काँग्रेसने तिकीट दिले होते. दुसऱ्या यादीत काँग्रेसे काही राज्यामंत्र्यांनाही तिकीट दिले आहे. त्यामध्ये ब्रिजेंद्रसिंह ओला (झुंझुनू), राजेंद्र सिंह यादव (कोतपुतली), मुरारी लाल मीना (दौसा), सुखराम विश्नोई (सांचोरे), अर्जुनसिंग बामनिया (बंसवाडा) या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसने आपल्या ३० मंत्र्यांपैकी २१ मंत्र्यांना आतापर्यंत पुन्हा तिकीट दिले आहे.

१५ आमदारांना दिली पुन्हा संधी

काँग्रेसने दुसऱ्या यादीत एकूण १५ आमदारांनाही पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामध्ये रघू शर्मा (केकरी), महेंद्र चौधरी (नवान), अमीन कागजी (किशनपोळ), रफिक खान (आदर्श नगर) रोहित बोहरा (राजा खेरा) या आमदारांचा समावेश आहे. पाच अपक्ष आमदारांनाही काँग्रेसने यावेळी तिकीट दिले आहे. त्यामध्ये बाबूलाल नागर (डुडू), लक्ष्मण मीना (बस्सी), ओम प्रकाश हुडला (माहवा), खुशवीर सिंह (मारवाड जंक्शन), सान्यम लोढा (सिरोही) या पाच अपक्ष आमदारांचा यात समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या भाजपाची सत्ता असलेल्या सात जागांवरही काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यापैकी चार जागांवर काँग्रेसने २०१८ साली उमेदवारी दिलेल्या नेत्यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. त्यामध्ये नसीम अख्तर यांना पुष्कर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. २०१८ सालच्या निवडणुकीत अख्तर यांना सुरेश सिंह रावत यांनी पराभूत केले होते. मावली मतदारसंघातून पुष्कर लाल दांगी यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यांना २०१८ साली धर्मनारायण जोशी यांनी पराभूत केले होते. सालूंबर मतदारसंघातून रघुवीर सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना २०१८ सालच्या निवडणुकीत अमृत लाल मीना यांनी पराभूत केले होते. घाटोल मतदारसंघातून नानालाल निनामा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना २०१८ सालच्या निवडणुकीत हरेंद्र निनामा यांनी पराभूत केले होते.