नीलेश पवार

जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याच्या उद्देशाने आमश्या पाडवी यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यास विधान परिषदेत निवडून आणण्याची किमया केल्यानंतर शिंदे गटामुळे बदललेल्या राजकारणात जिल्ह्यातील शिवसेनेची वाताहात झाली आहे. मागील ४८ तासात कोणी भाजपमध्ये तर कोणी शिंदे गटात गेले. अशा स्थितीतही कडवट शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी राहिल्याने शिवसेनेला ४८ तासात हादरेही बसले अन् निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे दिलासाही मिळाला.

अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जाणार अशी चर्चा असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे यांनी शनिवारी समर्थक कार्यकर्ते आणि नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करून चर्चेला पूर्णविराम दिला. भाजपमध्ये प्रवेश करून मोरे यांना काय मिळणार आहे, याची सध्या नंदुरबार शहरात चर्चा आहे. नंदुरबार नगरपरिषदेवर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची एकहाती सत्ता आहे. भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी आणि खासदार डॉ. हिना गावित यांनी रघुवंशी यांना शह देण्यासाठी कंबर कसली आहे. साक्री नगर परिषदेप्रमाणे यंदा नंदुरबारमध्ये सत्तांतर होईल, असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे रघुवंशी विरोधकांची मोट बांधण्याची रणनीती आखत विक्रांत मोरे यांना भाजपमध्ये आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे गावित परिवाराविरोधात नाराजीचा सूर व्यक्त करत मोरे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता त्याच परिवारावर विश्वास ठेवत ते भाजपमध्ये गेल्याने जिल्ह्यातील राजकारण्यांचे बदलते रंग मतदारांना दिसत आहेत.

दुसरीकडे शिवसेनेसाठी सध्या मोठा आधार ठरलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे रविवारी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात सामील झाले. मुळातच आमचा विरोध हा स्थानिक भाजप नेत्यांना असल्याचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणाऱ्या रघुवंशी यांचा भाजप विरोध आता किती तग धरेल, याबाबत शंकाच आहे. कारण, मुळातच भाजपच्या पाठबळावर मुख्यमंत्री शिंदे तग धरून आहेत. त्यामुळे भाजप विरोधात ते रघुवंशी यांचे हात कसे बळकट करणार ? रघुवंशी हे आपल्या आमदारकीच्या पुनर्वसनासाठीच शिंदे यांच्या गटात गेल्याचे म्हटले जाते. राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या अडवलेल्या बारा आमदारांच्या यादीत चंद्रकांत रघुवंशी यांचेही नाव होते. अशातच आगामी नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली तर ती त्यांच्या गटासाठी राजकीय संजीवनी ठरू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोनच दिवसांत मूळचे शिवसेनेचे नसलेल्या मोरे आणि रघुवंशी या दोन्ही नेत्यांनी एक प्रकारे शिवसेनेला हादरा दिलाच. या हादऱ्यातून जिल्ह्यातील शिवसेनेला सावरण्यासाठी लगेच सोमवारी जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी विधान परिषदेचे नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपण आजही निष्ठावंत असल्याचा संदेश दिला. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना श्वास घेण्यासाठी धडपडत होती. मात्र आता काँग्रेस आणि भाजपसारख्या पक्षांप्रमाणेच सत्तेच्या घडामोडींचे केंद्र राहिलेल्या शिवसेनेतील पक्षबदलाच्या आणि निष्ठेच्या राजकारणाने जिल्हा ढवळून निघाला आहे.