मोदी सरकारने आणलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करीत २०२० साली शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता मोदी सरकारने हे तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे शिरोमणी अकाली दल आणि भाजपा यांच्यातील जवळीक वाढल्याची चर्चा आहे. तसेच एनडीएत पुन्हा सहभागी होण्याबाबत शिरोमणी अकाली दल आणि भाजपामध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा वेळी पंजाबमध्ये पुन्हा एकदा शिरोमणी अकाली दल आणि भाजपा यांच्यामध्ये युती होणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही पक्षांतील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- युतीसंदर्भातील चर्चेचा पहिला टप्पा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पार पडला असून, पुढील बैठकही लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा – राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नियोजित वेळेआधी संपुष्टात येणार, यूपीतील बहुतेक भाग वगळणार

काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना, भाजपाचे नेते अमित शहा यांनी युतीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक पक्षाचे स्वागत असल्याचे म्हटले होते. “आम्हाला आमची युती मजबूत करायची असते. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत असतो. आम्ही नेहमी युतीत येणाऱ्या नवीन सहकाऱ्यांचं स्वागत केलं आहे. जनसंघाच्या काळापासून आमची विचारधारा एकच आहे. ज्यांना आमची विचारधारा मान्य असेल आणि ज्यांना युतीत सहभागी व्हायचं असेल, त्यांचं एनडीएत स्वागत आहे,” असे ते म्हणाले.

युतीसंदर्भात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”ज्यावेळी आप आणि काँग्रेसमध्ये युतीची चर्चा सुरू होती. त्यावेळी शिरोमणी अकाली दल आणि भाजपामध्येही युतीची चर्चा सुरू होती. मुळात शिरोमणी अकाली दलातील अनेक नेते एनडीएत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत”, असे ते म्हणाले.

महत्त्वाचे म्हणजे भाजपा दक्षिणेतील आपला पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाबरोबर युतीची चर्चा करीत आहेत; तर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूने पुन्हा एकदा एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी आता पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाबरोबर युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या संदर्भात ठोस असा निर्णय झालेला नाही. त्याला राज्यातील राजकीय परिस्थितीही जबाबदार आहे.

हेही वाचा – तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्याला अटक; ममता बॅनर्जींच्या पक्षाचे अटकेला समर्थन, यामागे नेमकं कारण काय?

२०२० शिरोमणी दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाने पंजाबमध्ये ग्रामीण भागात विशेषत: माळवा भागात आपला पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. २०२० पूर्वीच्या समीकरणानुसार, पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल १० जागा, तर भाजपा ३ जागा लढवीत होता. या तीन जागांमध्ये होशियारपूर, गुरुदारपूर व अमृतसर या जागांचा समावेश होता. मात्र, आता दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्यास, भाजपा जुने समीकरण मान्य करेल, याची शक्यता कमी आहे. तसेच पंजाबमध्ये पक्षबांधणीकरिता भाजपाचे पंजाबचे प्रभारी विजय रूपाणी व संघटन सचिव मंत्री श्रीनिवासुलू राज्यभरात सभा घेत आहेत.

या संदर्भात बोलताना, भाजपाच्या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या पंजाबमधील कार्यकारिणीचे सदस्य सतवंतसिंग पुनिया म्हणाले, “आम्ही संगरूर, मानसा, भटिंडा व बर्नाला यांसारख्या भागांत भाजपाच्या शाखा स्थापन केल्या आहेत. युतीच्या काळात या भागात भाजपा कार्यकर्त्यांची संख्या मर्यादित होती. आता दुर्गम भागातही भाजपा कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे.”

विशेष म्हणजे भाजपा-शिरोमणी अकाली दल युतीबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना विचारले असता, “मला या युतीबाबत कोणतीही माहिती नाही. १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान दिल्तीत भाजपाची राष्ट्रीय परिषद होणार आहे. कदाचित या परिषदेनंतर युतीबाबत निर्णय घेण्यात येईल”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा नवा प्रयोग, जाट समाजाच्या मतांसाठी आरएलडीशी युती? वाचा नेमकी रणनीती काय?

दरम्यान, भाजपाप्रमाणेच शिरोमणी अकाली दलाकडून पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले जात असून, त्यांनी पंजाब बचाओ यात्रा काढली आहे. १ फेब्रुवारी रोजी अटारी सीमेवरून सुरू झालेली ही यात्रा अमृतसर, खदूर साहिब, भटिंडा, फिरोजपूर व फरीदकोट या भागांतून मार्गक्रमण करणार आहे. तसेच यादरम्यान आचारसंहिता लागू झाल्यास त्यानंतरही ही यात्रा सुरू राहील आणि तो आमच्या निवडणूक प्रचाराचा भाग असेल, अशी माहिती शिरोमणी अकाली दलाचे नेते बलविंदर सिंग यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिली. दोन्ही पक्षांतील नेत्यांनी अनेकदा आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्यासंदर्भात विधाने केली आहेत. मात्र, दोघांनी एकमेकांवर टीका करण्याचे टाळले आहे. त्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speculation over alliance between shiromani akali sal and bjp old ally will return to nda spb
First published on: 12-02-2024 at 14:57 IST