काही दिवसांत राष्ट्रीय राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडत पुन्हा एकदा भाजपाशी हातमिळवणी केली. नितीश यांच्या या निर्णयामुळे आता इंडिया आघाडीचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान, याच इंडिया आघाडीसाठी तमिळनाडूतून सकारात्मक वृत्त येत आहे. येथे डीएमके आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी डीएमकेने काँग्रेसला एकूण नऊ जागा देण्यास सहमती दर्शविल्याचे सांगितले जात आहे.

इंडिया आघाडीत अस्थिरता असताना तमिळनाडूतून चर्चा यशस्वी

डीएमकेच्या चेन्नईतील मुख्यालयात २८ जानेवारी रोजी काँग्रेस आणि डीएमके या दोन्ही पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात आली असून, आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्यास या दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे. काही दिवसांपासून इंडिया आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. संयुक्त जनता दलाने इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसनेही आम्ही लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवू, असे जाहीर केले आहे. पंजाबमध्येही जागावाटपावरून काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात एकमत होत नाहीये. असे असतानाच तमिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाला अंतिम स्वरूप आल्याचे म्हटले जात आहे. इंडिया आघाडीसाठी ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

East Nagpur, Congress, booth planning,
पूर्व नागपुरात काँग्रेसची यंत्रणा तोकडी, बूथ नियोजनात ढिसाळपणा; स्थानिक नेत्यांऐवजी….
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!

२०१९ सालच्या निवडणुकीत काय घडले होते?

२८ तारखेला झालेल्या या बैठकीत डीएमकेने काँग्रेसला नऊ जागा देण्यास तयारी दाखवली आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने नऊ जागांवर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत नऊपैकी आठ जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता; तर थेनी या एका जागेवर एआयएडीएमके पक्षाने बाजी मारली होती. डीएमकेने सर्व २० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला एकूण १२.६ टक्के; तर डीएमकेला ३३.५ टक्के मते मिळाली होती.

डीएमकेच्या नेतृत्वाखालील युतीने जिंकल्या होत्या ३८ जागा

तमिळनाडूमधील आघाडीचे डीएमकेने नेतृत्व केले होते. या आघाडीत डीएमकेसह काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, विदुथलाई चिरुथैगल काची (व्हीसीके), इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल), तसेच अन्य छोट्या पक्षांचा समावेश होता. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत या युतीने ३९ पैकी ३८ जागांवर बाजी मारली होती.

काँग्रेसने काय प्रतिक्रिया दिली?

२८ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रीय आघाडीचे समन्वयक (एनएसी) तथा काँग्रेसचे नेतृत्व काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी केले होते. या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद, तमिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. एस. अलाईगिरी आदी नेत्यांचा समावेश होता. या बैठकीनंतर वासनिक यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तमिळनाडूतील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी समविचारी पक्ष पुन्हा एकदा एकत्र निवडणूक लढवतील. विभाजनवादी शक्तींचा सामना करण्यासाठी, तसेच लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ही आघाडी फार महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे दक्षिण तमिळनाडूवर विशेष लक्ष

काँग्रेसने तमिळनाडूत नऊ जागांची मागणी केली असून, हा पक्ष राज्याच्या दक्षिणेकडील मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करणार आहे. या भागात कन्याकुमारी, तिरुनेलवेली, विरुधुनगर, शिवगंगा, अरणी, तिरुवल्लूर किंवा कांचीपुरम, त्रिची, करूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

इतर सहकारी पक्षांशी चर्चा होणे बाकी

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसला नऊ जागा देण्याचे डीएमकेने मान्य केले असले तरी भविष्यात काही जागांवर तडजोड होण्याची शक्यता आहे. काही जागांची अदलाबदलीही होऊ शकते. दुसरीकडे डीएमकेची काँग्रेससोबतची चर्चा जवळपास झाली असली तरी डीएमकेची आघाडीच्या अन्य घटक पक्षांशी चर्चा होणे बाकी आहे. त्यासाठी पक्षाची समन्वय आणि जाहीरनामा समिती जिल्हा पातळीवरील नेतृत्वाशी चर्चा करीत आहे.

अन्य मित्रपक्षांना किती जागा?

काही आठवड्यांत डीएमके आपल्या इतर मित्रपक्षांशी जागावाटपावर चर्चा करू शकतो. प्राथमिक माहितीनुसार- डीएमकेकडून सीपीआय व सीपीआय (एम)ला प्रत्येकी दोन जागा, व्हीसीकेला दोन जागा, एमडीएमके, कमल हसन यांच्या मक्कल नीदी मैम व कोंगुनाडू मुन्नेत्र कळघम या पक्षांना प्रत्येकी एक जागा दिली जाऊ शकते. काही जागांवर इतर पक्षांचे उमेदवार डीएमकेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.