मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने हिंदुत्व सोडल्याचा जोरदार प्रचार भाजप एकीकडे करीत असताना निवडणूक आयोगाने प्रचारगीतातून हिंदू आणि भवानी शब्द काढून टाकण्याची दिलेली नोटीस ठाकरे गटाला प्रचाराचे आयते कोलीत मिळवून देणारी आहे. आम्ही हिंदुत्व जपत आहोत आणि महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा जागर करीत असताना भाजप सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आम्हाला कशा प्रकारे हैराण करीत आहे ते बघा, असा प्रचार करण्यास उद्धव ठाकरे पुढील सहा टप्प्यांसाठी मोकळे झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला निवडणूक आयोगाच्या या नोटीसमुळे ठाकरे गट जशास तसे उत्तर देणार आहे. ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने दिलेला हा उसळता चेंडू (फूल टाॅस) असल्याचे मानले जात आहे. राज्यात साडेचार वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे परांपरागत विरोधक एकत्र आले. तेव्हापासून राज्यात २५ वर्षे असलेली शिवसेना भाजपा युती तुटली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा जोरदार प्रचार भाजपने सुरु केला.

हेही वाचा – जाहीरनाम्यांची प्रतीक्षाच; पहिला टप्पा होऊनही शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जाहीरनामे नाहीत

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फुट पडली आणि एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडला. त्यामुळे भाजपला प्रचाराची आयती संधी मिळाली. हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन हा गट बाहेर पडल्याचा दावा भाजपसह शिंदे गट करीत आहे. भाजपच्या या दाव्याला निवडणूक आयोगाने सुरुंग लावला आहे. ठाकरे गटाने तयार केलेल्या नवीन मशाल प्रचार गीतात हिंदू आणि जय भवानी हे दोन शब्द वापरण्यास ठाकरे गटाला मज्जाव केला गेला आहे. याचा फायदा उद्धव ठाकरे यांनी उचलला असून येत्या काळात भवानी मातेचा अपमान सहन करणार नाही हा केंद्रबिंदू राहील, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

हेही वाचा –  ‘मोदी मित्र’च्या आडून भाजपची मते वाढविण्याचा प्रयोग!

भवानी मातेचा जयजयकार करणारच अशी आक्रमक भूमिका घेऊन ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे. राज्यातील अनेक जाती धर्माच्या जनतेची भवानी माता ही कुलदेवता आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही. त्याचा एका गीतामध्ये केलेला समावेश भाजप सरकारला सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नोटीस बजावली आहे, पण हा शब्द प्रचार गीतामधून काढणे तर दूर तो सातत्याने बोलत राहू असा संदेश ठाकरे यांनी दिला आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी बजरंग बली, रामलल्ला हे देवांचे शब्द वापरलेले चालतात आणि आम्ही वापरलेला देवीचा भवानी शब्द चालत नाही हा विरोधाभास ठाकरे यांनी जनतेच्या लक्षात आणून दिला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray got an issue to campaign against mahayuti print politics news ssb
First published on: 22-04-2024 at 10:46 IST