नाशिक – देशात कांदा आणि द्राक्ष उत्पादनात अग्रस्थानी असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत लाखाच्या आसपास मते घेणाऱ्या माकपने यंदा निवडणूक रिंगणातून माघार घेत महाविकास आघाडीबरोबर राहण्याचे निश्चित केले आहे. शरद पवार यांच्या बेरजेच्या राजकारणाने या ठिकाणी भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यातील लढत माकपच्या निर्णयामुळे आता रंगतदार झाली आहे.

अनुसूचित जमातीसाठी राखीव दिंडोरी मतदारसंघात शेतकरी, शेतमजूर मतदारांंची संख्या मोठी आहे. एकसंघ राष्ट्रवादीने ही जागा ताब्यात घेण्याचे अनेकदा प्रयत्न केले. मात्र ते अयशस्वी ठरले. राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर शरद पवार यांनी नव्या समीकरणांची मांडणी केली. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटातील चार तर, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे. सलग चारवेळा भाजपचा उमेदवार या जागेवर विजयी झाला आहे. महायुतीच्या उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांंच्या विरोधात तुल्यबळ लढतीचे नियोजन करताना मतांची फाटाफूट होणार नाही, याची काळजी राष्ट्रवादी शरद पवार गट घेत आहे. यातून आदिवासीबहुल भागात प्रभाव राखणाऱ्या माकपला निवडणुकीच्या रिंगणापासून दूर ठेवण्यात आले.

हेही वाचा – ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी

महाविकास आघाडीने दिंडोरीची जागा द्यावी, असा माकपचा प्रयत्न होता. या पक्षाचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्याशी नाशिक दौऱ्यात पवार यांनी चर्चा केली होती. लोकसभेत माकपने महाविकास आघाडीला मदत करावी. विधानसभा निवडणुकीत माकपला हा मतदारसंघ सोडला जाईल, असे पवार यांनी सुचवले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाला ही जागा मिळाल्यानंतर माकपने आपला उमेदवार देण्याची तयारी केली होती. तथापि, शरद पवार यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर माकपने दिंडोरी मतदारसंघात निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. माकप आता राष्ट्रवादी शरद पवार गट अर्थात महाविकास आघाडीला मदत करणार असल्याचे या पक्षाचे माजी आमदार गावित यांनी म्हटले आहे. माकपचा हा निर्णय शरद पवार गटाला बळ देणारा असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा – “रामाच्या नावाचा वापर ही लांच्छनास्पद बाब; भाजपाला रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवीय”; काँग्रेस नेते गौरव गोगोईंचा भाजपावर आरोप

माकपची मते किती ?

आदिवासी बांधवांच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करणाऱ्या माकपचा आदिवासीबहुल भागात प्रभाव आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपला विक्रमी मताधिक्य मिळते, असा मागील काही निवडणुकींचा इतिहास आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी सुमारे दोन लाखांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांनी एकसंघ राष्ट्रवादीचे धनराज महाले यांना धूळ चारली होती. तेव्हा माकपचे उमेदवार जिवा पांडू गावित यांना १०९५७० मते मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी ५४२७८४ मते मिळवत राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांना पराभूत केले होते. माकपच्या हेमंत वाघेरे यांना त्यावेळी ७२,५९९ मते मिळाली होती. २००९ मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांना पराभूत केले होते. या निवडणुकीत माकपच्या जिवा पांडू गावित यांना १०५३५२ मते मिळाली होती. मतदारसंघात एक लाखाच्या आसपास असणारी माकपची मते महाविकास आघाडीकडे वळविण्याचे नियोजन शरद पवार गटाने केले आहे.