काँग्रेसचे वरिष्ठ नेते गौरव गोगोई हे ईशान्येकडील काँग्रेसचा मुख्य चेहरा आहेत. ते लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते आहेत. त्यांच्या खांद्यावर पक्षाचे पुनरुज्जीवन घडवून आणण्याची जबाबदारी आहे. कालियाबोरमधून दोनदा पक्षाचं प्रतिनिधीत्व केल्यानंतर त्यांना जोरहाटमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याच ठिकाणाहून त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई तीनदा निवडून आले होते. भाजपाप्रणित एनडीए आघाडीला चारशेपार जागा मिळणार नाहीत, कारण त्या स्वप्नांच्या आड ‘इंडिया’ आघाडी उभी असल्याचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले आहे. तसेच भाजपा रामाच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भगवान राम सर्वांचे असून मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर करणे ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपाला देशात रशियासारखीच अल्पाधिकारशाही हवी आहे, असा आरोपही त्यांनी ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

मित्रपक्षांनीच काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत, या अवस्थेत ‘इंडिया’ आघाडी सुस्थितीत आहे असे म्हणता येईल का?
तृणमूल काँग्रेसने मेघालयातील तुरामध्ये, आम आदमी पक्षाने लखीमपूरमध्ये, तर आसाम जातीय परिषद या मित्रपक्षाने दिब्रुगढमध्ये आपले उमेदवार दिले आहेत. मात्र, देशातील लोकांना आता याची जाणीव आहे की, आम्ही एका ठिकाणी मित्र तर एखाद्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधातही असू शकतो. उदाहरणार्थ, आप पक्ष आणि काँग्रेस दिल्ली आणि पंजाबमध्ये, तर डावे पक्ष आणि काँग्रेस पक्ष केरळमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

तसेच लोकांना हेदेखील लक्षात आले आहे की, भाजपा ‘वापरा आणि फेकून द्या’ हे धोरण आपल्याच मित्रपक्षांबाबत वापरते. पंजाबमधील अकाली दल असो वा तमिळनाडूतील एआयएडीएमके हा पक्ष असो, त्यांच्याबाबत भाजपाने हेच केलेले आहे. याबाबत इंडिया आघाडी ही एनडीए आघाडीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहे.

हेही वाचा : ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी

सरकारने केलेल्या दंडात्मक उपायांमुळे काँग्रेसच्या प्रचारावर परिणाम झाला आहे का?

ही गोष्ट फक्त राजकारणी वा राजकीय पक्षांबाबत नाही. कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच विविध योजनांच्या माध्यमातून भाजपाकडून छळले जात आहे. त्यांना रशियन पद्धतीची अल्पाधिकारशाहीआणायची आहे, तर काँग्रेस पक्ष हा संविधानात असलेल्या लोकशाही मूल्यांसाठी लढतो आहे.

या निवडणुकीमध्ये मुस्लीम आणि आदिवासी काँग्रेससाठी कितपत महत्त्वाचे आहेत?

भाजपाच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही. निव्वळ चमकदार घोषणा न देता सामाजिक न्यायासाठी काम करत राहणं आणि वेगवेगळ्या समुदायांना एकत्र आणणे यावर काँग्रेसचा विश्वास असल्याचे भारत जोडो यात्रेने दाखवून दिले आहे. फक्त निवडणुकीसाठी नाही, तर नेहमीच सगळेच समुदाय आमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

आदिवासी किंवा चहाच्या मळ्यातील कामगार भाजपाकडे वळले आहेत असा एक समज आहे, परंतु समाजातील तरुण आज औद्योगिक संकटामुळे आणि रोजगाराच्या संधींच्या अभावामुळे निराश झाले आहेत. आदिवासींमध्ये असलेली विविधतादेखील धोक्यात आली आहे. कारण, भाजपा ज्या सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांवर विश्वास ठेवते, तीच मूल्ये आज सगळीकडे लादली जात आहेत. संसाधनांच्या योग्य वाटपासाठी जातनिहाय जनगणनेचे वचन राहुल गांधी यांनी दिले आहे. सध्या समाजामध्ये त्याची जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा : आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?

मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपा एआययुडीएफसोबत काम करते आहे का?

जे काम असदुद्दीन ओवैसी एआयएमआयएमच्या माध्यमातून देशातील इतर भागामध्ये करत आहेत, तेच काम आसाममध्ये बद्रुद्दीन अजमल हे एआययुडीएफ (ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट) च्या माध्यमातून करत आहेत. भाजपाची बी-टीम होऊन हे काँग्रेसमुक्त भारताचे भाजपाचे ध्येय साध्य करण्यासाठी काम करत आहेत. मात्र, काही मतदारांना त्यांनी लक्ष्य केले आहे तेच या रचनेतून दिसून आले आहे.

‘चारशेपार’ जाण्याचे भाजपाचे स्वप्न इंडिया आघाडी रोखू शकेल?
भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विविध संस्थांची स्वायत्तता कायम राखली जाईल, हे वचन आम्ही देत आहोत त्यावर लोक किती विश्वास ठेवतात यावर ही गोष्ट अवलंबून राहील. अशाप्रकारचे चारशेपारचे वगैरे लक्ष्य ठेवणे म्हणजे काहीही करून जिंकण्यासाठी एकप्रकारच्या रचनेवर विसंबून राहण्यासारखे आहे.