scorecardresearch

Premium

सांगोला सूत गिरणी निवडणुकीत शेकापचे भवितव्य ठरणार; शहाजीबापू पाटील यांच्या भूमिकेकडेही लक्ष

१७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत दिवंगत गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख व नातू डॉ. अनिकेत देशमुख आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे कौशल्य पणाला लागणार आहे.

yarn mill election shekap party mla shahaji patil ganpatrao deshmukh sangola solapur

एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : एकाच पक्षाकडून आणि एकाच मतदारसंघातून तब्बल अकरावेळा आमदार होऊनही ज्यांचे पाय आयुष्यभर जमिनीवर होते, सांगोला भागासारख्या दुष्काळी भागाचे नंदनवन करताना ज्यांनी सहकार रूजविला, निःस्वार्थपणे टिकविला आणि संस्था यशस्वीपणे चालविल्या, त्यांच्या विचारांवर या संस्था आजही भक्कमपणे टिकून आहेत, असे शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पश्चात प्रथमच सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीची निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की प्रत्यक्ष लढती होणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह माणदेश भागाचे लक्ष वेधले आहे.

eknath shinde ajit pawar bjp leaders sattakaran
शिंदे-पवारांच्या कुरघोडीने भाजप नेत्यांची पंचाईत
devendra-fadnavis
“नरेंद्र मोदींच्या संकल्पपूर्तीसाठी महात्मा गांधींनी आशीर्वाद द्यावा,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मागणे…
chandrashekhar bawankule and gopichand padalkar
पडळकरांचे वादग्रस्त विधान, माफी मागितली चंद्रशेखर बावनकुळेंनी!
Jagan Mohan Reddy and Chandrabbau Naidu
चंद्राबाबू यांच्या अटकेनंतर तेलगू देसम पक्षाच्या सर्व २१ आमदारांना गृहकैद, राज्यभर पोलिस तैनात

१७ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत दिवंगत गणपतराव देशमुख यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख व नातू डॉ. अनिकेत देशमुख आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. सांगोल्याचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे आणि काँग्रेसचे नेते प्रा. पी. सी. झपके यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेकापचे भवितव्य याच निवडणुकीवर अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा :रायगडमध्ये बल्क ड्रग प्रकल्पावरून सत्ताधारी शिंदे गट- भाजपच आमने सामने

भाई गणपतराव देशमुख यांनी १९८० साली सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीची उभारणी केली होती. ही सूतगिरणी सध्याच्या प्रतिकूल काळातही स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे. शेकडो कोटींपेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या या सूतगिरणीकडून चीन, इजिप्त, मलेशिया, बांगलादेश आदी देशांना सूत निर्यात होते. राज्यात एका पाठोपाठ एक सूतगिरण्या बंद होत असताना आणि बहुसंख्य सूतगिरण्यांना अखेरची घरघर लागली असताना सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी केवळ व्यवस्थापन आणि सचोटीच्या कारभारामुळे उत्तम प्रकारे चालू आहे. मात्र गणपतराव देशमुख यांच्या पश्चात या सूतगिरणीचा गाडा पुढे नेणे हे त्यांच्या राजकीय वारसदारांपुढील आव्हान मानले जाते. म्हणूनच त्यांच्यासाठी सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीची लागलेली निवडणूक कसोटीची ठरणार आहे.

गणपतराव देशमुख यांनी कार्यकर्त्यांची योग्य पारख करून त्यांच्याकडे संस्थांची जबाबदारी सोपविली होती. सांगोला सूतगिरणीची जबाबदारी सुरुवातीच्या काळात दिवंगत नेते ॲड. वसंतराव पाटील यांनी अतिशय कुशलतेने सांभाळली होती. त्यांच्यानंतर अलिकडे सलग १५ वर्षे नानासाहेब लिगाडे यांनी या सूतगिरणीची धुरा तेवढ्याच नेटाने सांभाळून संस्थेला आर्थिक संकटाच्या चक्रातून बाहेर काढले होते. लिगाडे यांचा मूळ शिक्षकी पेशा होता. परंतु गणपतराव देशमुख यांच्या पारखी नजरेतून लिगाडे यांनी शिक्षकी पेशा सोडून सूतगिरणीची जबाबदारी स्वीकारली होती. असे अनुभवी, कार्यकुशल नानासाहेब लिगाडे यांनी आता सूतगिरणीच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
त्यांच्या शिवाय इतर काही दिग्गज मंडळीही या निवडणुकीपासून दूर आहेत. यात बाबूराव गायकवाड, शहाजी नलवडे, शिवाजी मिसाळ, विशालदीप बाबर, गोविंद जाधव, अंकुश येडगे आदींचा समावेश आहे.

हेही वाचा :जळगाव जिल्हा दूध संघातील राजकारणात एकनाथ खडसेंच्या कोंडीचा प्रयत्न

या मंडळींनी स्वतःला निवडणुकीपासून स्वतःला का दूर ठेवले, याचे कारण स्पष्ट झाले नाही. याच पार्श्वभूमीवर गणपतराव देशमुख यांच्या राजकीय वारसदारांचा सूतगिरणी ताब्यात ठेवताना राजकीय कस लागणार आहे. प्राप्त परिस्थितीचा लाभ उठवत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते, आमदार ॲड. शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार दीपक साळुंखे आदींचे महत्त्व वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. २७ आॕक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या सूतगिरणीचे एकूण सभासद मतदार ११ हजार ५६० एवढे असून यात कापूस उत्पादक शेतकरी मतदार ७०९३ तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदार ४४६७ आहेत. संस्था प्रतिनिधी मतदारांची संख्या ८१ आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yarn mill election shekap party mla shahaji patil ganpatrao deshmukh sangola solapur print politics news tmb 01

First published on: 26-10-2022 at 11:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×