प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात मुंबईच्या NSCI मैदानात खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांमध्ये गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने पुन्हा एकदा यू मुम्बावर मात केली. अटीतटीच्या लढाईत गुजरातने ३८-३६ अशी बाजी मारली. प्रो-कबड्डीच्या इतिहासात यू मुम्बाविरुद्ध अजिंक्य राहण्याचा गुजरातचा रेकॉर्ड कालच्या सामन्यातही कायम राहिला. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचे प्रशिक्षक मनप्रीत सिंह यांना आपल्या बचावफळीची चिंता असल्याचं दिसून आलं.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर मुंबई गुजरातकडून पराभूत

यू मुम्बाविरुद्ध सामन्यात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने दोनदा आघाडी घेतली होती. मात्र प्रत्येक वेळी यू मुम्बाने दमदार पुनरागमन करत सामना रंगतदार अवस्थेत आणला. अखेरच्या काही सेकंदांमध्ये गुजरातने सामन्याची सुत्र आपल्या हाती कायम राखत विजय मिळवला खरा, मात्र मुम्बाविरुद्धच्या सामन्यात गुजरातच्या बचावपटूंची क्षुल्लक चुका केल्या. संघाच्या बचावफळीच्या कामगिरीबद्दल विचारलं असताना मनप्रीत सिंहने आपल्या संघाची बाजू सावरुन धरली, मात्र त्यांच्या बोलण्यातून बचावफळीची चिंता स्पष्ट दिसतं होती.

“आमच्या संघातले बचावपटू हे नवीन आहेत. प्रो-कबड्डी सारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जोशात कधी-कधी त्यांच्याकडून चुका होऊन जातात. त्यांना संयमाची गरज आहे, पण या गोष्टी कालानुरुप त्यांना समजतील. मात्र आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यात त्यांनी मला पूर्णपणे निराश केलेलं नाही. खेळात सुधारणेला अजुन वाव आहे, आणि बचावपटू ते करतीलही मात्र आतापर्यंतच्या कामगिरीवर मी खूश आहे.” मनप्रीतने आपल्या खेळाडूंची बाजू सावरुन धरली.

अवश्य वाचा – संघाच्या पराभवाला मी जबाबदार! यू मुम्बाचा कर्णधार फजल अत्राचलीची कबुली

गुजरातविरुद्धच्या सामन्यात ७ पेक्षा कमी गुणांनी पराभव स्विकारावा लागल्यामुळे यू मुम्बाच्या खात्यात १ गुण जमा झाला आहे. सध्या अ गटात यू मुम्बाचा संघ ४० गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर गुजरात फॉर्च्युनजाएंट संघ ३४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या यू मुम्बाचा संघ घरच्या मैदानावरचे सामने खेळत असल्यामुळे, त्यांना आपली आघाडी कायम राखण्याची चांगली संधी मिळणार आहे.