प्रो कबड्डी लीग

मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात बाद फेरीसाठी अ-गटातील तीन संघ आणि ब-गटातील दोन संघ निश्चित झाले असून, उर्वरित एका स्थानासाठी बलाढय़ पाटणा पायरेट्स आणि यूपी योद्धा यांच्यात साखळीच्या अखेरच्या तीन दिवसांत तीव्र स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

कोची आणि मुंबई येथे होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यांसाठी अ-गटातून गुजरात फॉच्र्युनजायंट्स, यू मुंबा आणि दबंग दिल्ली हे तीन संघ पात्र ठरले आहेत. याचप्रमाणे ब-गटातून बेंगळुरु बुल्स आणि बंगाल वॉरियर्स हे दोन संघ निश्चित झाले आहेत.

मात्र तिसऱ्या जागेसाठी पाटणा आणि यूपी यांच्या आशा साखळीमधील अखेरच्या सामन्यावर अवलंबून आहेत. पाटण्याची शेवटची लढत २६ डिसेंबरला गुजरात फॉच्र्युनजायंटशी होणार आहे, तर यूपी योद्धाचा अखेरचा सामना २७ डिसेंबरला होणार आहे. मात्र पाटणा आणि यूपी या दोन्ही संघांनी पराभव पत्करल्यास तेलुगु टायटन्सलाही बाद फेरीची निसटती आशा आहे. त्यामुळे चाहत्यांना उर्वरित सामन्यांचे वेध लागले आहेत.

ब-गटातील बाद फेरीचे समीकरण

’ पाटण्याने गुजरातला नमवल्यास त्यांच्या खात्यावर एकूण ६० गुण जमा होतील आणि ते बाद फेरीसाठी पात्र ठरतील.

’ पाटण्याने गुजरातला बरोबरीत रोखले, तरी त्यांचे एकूण ५८ गुण होतील आणि ते बाद फेरी गाठू शकतील.

’ पाटण्याने गुजरातविरुद्धची लढत ७ किंवा त्यापेक्षा कमी गुणांच्या फरकाने गमावल्यास त्यांना एक गुण मिळेल. त्यामुळे पाटण्याच्या खात्यावर एकूण ५६ गुण जमा होतील. या परिस्थितीत यूपी योद्धाने बंगाल वॉरियर्सला हरवल्यास ते बाद फेरी गाठू शकतील.

’ पाटण्याने गुजरातविरुद्धचा सामना मोठय़ा फरकाने गमावला, तर त्यांच्या खात्यावर ५५ गुणच असतील. मग यूपी योद्धा संघ बंगालला नमवून एकूण ५७ गुणांसह बाद फेरी गाठू शकेल.

’ पाटणा आणि यूपी योद्धा या दोन्ही संघांनी आपापले सामने मोठय़ा फरकाने गमावले आणि तेलुगु टायन्सने बंगाल वॉरियर्सविरुद्धचा सामना जिंकल्यास त्यांना बाद फेरीची आशा धरता येईल. या स्थितीत पाटणा आणि तेलुगु या दोन्ही संघांच्या खात्यावर प्रत्येकी ५५ गुण जमा होतील. त्यामुळे बाद फेरीसाठीचा तिसरा संघ गुणफरकाआधारे निश्चित होऊ शकेल.