शहरातील काही महाविद्यालयांमध्ये अकरावीचे नियमबाह्य़ प्रवेश झाल्याचे समोर आल्यानंतर भरारी पथकांच्या माध्यमातून सर्व महाविद्यालयांच्या प्रवेशांची तपासणी करण्याचा निर्णय विभागाने घेतला. त्यानुसार पथके स्थापनही करण्यात आली. पथकांच्या तपासणीनंतर एखाद्या महाविद्यालयात नियमबाह्य़ प्रवेश सापडल्यास पथकावरच कारवाई करण्याच्या मागणीमुळे प्रत्यक्षात अनेक महाविद्यालयातील प्रवेशांची तपासणी झालीच नसल्याचे दिसत आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर काही महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य़ पद्धतीने प्रवेश केल्याचे उघडकीस आले होते. हे प्रवेश रद्दही करण्यात आले होते. प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात महाविद्यालयांमधील रिक्त जागा, झालेले प्रवेश याचा नेमका अंदाज विभागीय संचालक कार्यालयालाही येत नव्हता. त्यातच प्रवेश घेण्याची मुदत सातत्याने वाढवून देण्यात येत होती. या सगळ्या पाश्र्वभूमीवर झालेल्या सर्व प्रवेशांची तपासणी करण्याची घोषणा विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आली. प्रवेशाच्या तपासणीसाठी भरारी पथकेही नेमण्यात आली. मात्र, त्यानंतर या भरारी पथकांना नेमके किती आणि काय अधिकार असावेत, ते कोणकोणती कागदपत्रे पाहणार याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. पथकांच्या तपासणीनंतर ज्या महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य़ प्रवेश आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत न्यायालयानी लढाई लढणाऱ्या पालक वैशाली बाफना यांनी केली होती. मात्र, त्यानंतर प्रवेशाच्या पाहणीची योजना बारगळल्याचे दिसत आहे.
शहराचे नऊ भाग करून प्रत्येक भागातील महाविद्यालयांसाठी एक पथक नेमण्यात आले होते. प्रवेश प्रक्रिया होऊन महिना होत आला तरीही अनेक महाविद्यालयांमध्ये अद्यापही प्रवेशाची पाहणी झालेली नाही. प्रवेश प्रक्रिया होऊन कालावधी लोटल्यामुळे आता प्रवेशांची पाहणी करून काय साध्य होणार याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत विभागीय उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सांगितले, ‘भरारी पथके नेमण्यात आली होती. त्यांना पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. अहवाल आले आहेत का, पाहणी झाली नसल्यास का झाली नाही याची माहिती घेण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या पथकाने पाहणी केल्यानंतरही महाविद्यालयांमध्ये नियमबाह्य़ प्रवेश आढळल्यास त्या पथकांवर कारवाईही करण्यात येईल.’