अस्तित्वातील बेकायदेशीर बांधकामे नियमित करावीत या मागणीसाठी वडगावशेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेरा नगरसेवकांनी मंगळवारी राजीनामे देण्याचे नाटय़ महापालिकेत घडले. या मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांनीही याच प्रश्नावर सोमवारी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांनीही राजीनामे दिले असले, तरी ते आयुक्तांकडे न देता पक्षाकडे दिल्यामुळे हा निव्वळ ‘स्टंट’ असल्याचे लगेचच उघड झाले.
सध्या शहरात असलेली सर्वसामान्यांची छोटी बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याची गरज आहे. सर्वसामान्यांना घरे बांधण्यासाठीची नियमावली देखील जाचक असून या नियमावलीत बदल करण्यास राज्य शासनाकडून विलंब होत आहे. हा विलंब करणाऱ्या निष्क्रिय राज्य शासनाचा निषेध म्हणून आम्ही नगरसेवक पदाचे राजीनामे देत आहोत, असे पत्र तेरा नगरसेवकांनी मंगळवारी सभागृहनेता सुभाष जगताप यांना दिले. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच शासन असल्यामुळे या नगरसेवकांनी राजीनामा पत्रात स्वत:च्याच शासनाचा निषेध केला आहे याकडे लक्ष वेधले असता, जरी आघाडी सरकार असले, तरी नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांनी हा निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे सांगण्यात आले.
राजीनामा पत्रावर रेखा टिंगरे, अनिल टिंगरे, संजीला पठारे, महेंद्र पठारे, उषा कळमकर, महादेव पठारे, सतीश म्हस्के, मीना परदेशी, किशोर विटकर, सुनील गोगले, मीनल सरवदे, बापुराव कर्णे गुरुजी आणि सुमन पठारे यांनी स्वाक्षरी केली आहे. पुणे व िपपरीमधील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठीचा प्रस्ताव चालू विधानसभा अधिवेशनात येणार होता. मात्र, तो न आल्यामुळे राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी त्यानंतर पिंपरीतील नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्यापुढील भागात पुण्यातील नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.
शासनाकडूनच दिरंगाई- जगताप
विकास आराखडा मंजूर करताना बांधकाम नियमावलीत सुधारणा करण्याबाबत तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून तसेच नगरविकास विभागाकडून ही नियमावली मंजूर करताना दिरंगाई होत आहे, असे सभागृहनेता सुभाष जगताप म्हणाले. राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.