धरणक्षेत्रात वादळी पाऊस कायम

पुणे :  ‘निसर्ग’  चक्रीवादळाचा परिणाम म्हणून शहराबरोबरच धरणक्षेत्रांतही सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या दमदार पावसामुळे शहराला १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा झाल्याचे जलसंपदा विभागाकडून गुरुवारी सांगण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांनंतर गुरुवारी दिवसभरातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस पडला. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरण परिसरात तब्बल २४५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १३५ मि.मी., पानशेत धरण क्षेत्रात १३७ मि.मी. आणि खडकवासला धरण परिसरात ७७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३० मि. मी., वरसगाव धरण परिसरात १८ मि. मी., पानशेत धरण क्षेत्रात १९ मि.मी. आणि खडकवासला धरणक्षेत्रात २७ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी दिवसभरात म्हणजेच सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर धरण क्षेत्रांत तब्बल १०३ मि.मी. आणि खडकवासला धरण परिसरात १० मि.मी. आणि वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी ५० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांत धरणक्षेत्रांत झालेल्या पावसामुळे झाला असल्याचे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदवले. दरम्यान, टेमघर धरणाची दुरुस्ती सुरू असल्याने हे धरण यापूर्वीच रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित तीन धरणांमध्ये मिळून सध्या सात अब्ज घनफूटपेक्षा (टीएमसी) अधिक पाणीसाठा आहे, अशी माहिती खडकवासला धरण उपविभागीय अधिकारी वामन भालेराव यांनी दिली.