पिंपरी- चिंचवडमध्ये आकुर्डी येथे आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशाल भांडे असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. विशालची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. तो शिक्षणासोबतच दररोज सकाळी घरोघरी वृत्तपत्र टाकायचे काम करायचा.

विशाल हा आकुर्डी येथील आयटीआय प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. त्याची घरची परिस्थिती हलाखीची होती. विशालचे वडील हे पुण्यातील एका खासगी संस्थेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी विशालही सकाळी वृत्तपत्र टाकायचे काम करायचा. सोमवारी विशालचे वडील हे कामावर गेले होते. तर आई आणि बहीण इंदापूरमध्ये नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी गेल्या होत्या. विशाल घरात एकटाच होता. विशालचे वडील हे ओव्हरटाइम करण्यासाठी कामाच्या ठिकाणीच थांबले. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास परिसरात पेपर टाकणाऱ्या व्यक्तीने खिडकीतून विशालच्या घरात पाहिले असता विशालने गळफास घेतल्याचे समोर आले. याघटनेची माहिती तातडीने त्याच्या वडिलांना देण्यात आली. वडिलांनी घरी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. विशालला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. विशालने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.