लष्कर भरतीमध्ये नियुक्ती पत्र देण्यासाठी एका तरुणाकडून दहा हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून दोन लष्करी जवानास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या प्रकरणात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा सहभाग असल्याण्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली आहे.
सचिन विश्वास कदम (वय ३५) आणि सोनूकुमार जयप्रकाश सिंग (रा. दोघेही खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अविनाश जालिंदर पवार (वय १९) याने तक्रार दिली आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अविनाशने लष्करातील जवान या पदासाठीची परीक्षा २६ मे रोजी दिली होती. ही परीक्षा दिल्यानंतर २२ जून रोजी कदम याने अविनाशला फोन करून नियुक्ती पत्र देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. त्या वेळी अविनाशच्या वडिलांनी गरीब परिस्थिती असल्याचे सांगून तडजोडअंती एक लाख वीस हजार रुपये देण्याचे मान्य केले. २० जून रोजी कदम याने अविनाशला फोन करून लाचेची रक्कम मागितली. त्याला दहावीचे गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्याची मागणी केली. त्यानुसार खडकी रेल्वे स्थानकासमोर शनिवारी कदमला दहा हजारांची लाच घेताना सीबीआयने रंगेहात पकडले. लाच घेतलेले दहा हजार रुपये हे ठरलेल्या रकमेचा भाग होते. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर भरती निवड प्रक्रियेतील लिपिक नायक सोनूकुमारच्या सांगण्यावरून हे पेसे घेतल्याचे सांगितले. सोनूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली. त्यांना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्याबाबत तपासाची आवश्यकता आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. तो युक्तिवाद ग्राह्य़ धरून दोघांना एक जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2013 रोजी प्रकाशित
लष्करात भरतीसाठी लाच घेताना दोन जवानांस अटक
लष्कर भरतीमध्ये नियुक्ती पत्र देण्यासाठी एका तरुणाकडून दहा हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून दोन लष्करी जवानास केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

First published on: 24-06-2013 at 02:37 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 army soldier arrested in case of accepting bribe