गणेश विसर्जनाच्या दिवशी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला होता आणि हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. नेहमीच पावसाच्या अंदाजाबाबत चेष्टेचा विषय ठरणारी वेधशाळा यावर्षी मात्र अंदाजामध्ये शंभर टक्के यशस्वी झाली. शहरात गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये तब्बल २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातील ७० मिलिमीटर पाऊस गणेश विसर्जनाच्या दिवशी झाला.
वेधशाळेने हवामानाचा अंदाज वर्तविल्यानंतर अनेक वेळा पाऊस पडतच नाही. त्यामुळे नागरिकांकडून नेहमी वेधशाळेच्या अंदाजाबाबत शंका व्यक्त केली जाते. पण, विसर्जन काळात राज्यासह पुण्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. पुण्यात बुधवारी दुपारी आणि संध्याकाळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. गेल्या चोवीस तासात पुणे वेधशाळेत ७०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाचा विसर्जन मिरवणुकीवर चांगलाच परिमाण झाला.
बंगालच्या उपसागरामध्ये ओरिसाजवळ निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि कर्नाटक किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंत कार्यरत असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी राज्यात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात तब्बल २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गणेशचतुर्थीला गणरायाचे आगमन झाले आणि त्याच दिवशी रात्री जोरदार पाऊस झाला. पुढेही एक दिवसाचा अपवाद वगळता रोज पावसाची हजेरी लागली. अनंतचतुर्दशीला तर उत्सवातील सर्वाधिक पाऊस पडला. या पावसाने मिरवणुकीच्या उत्साहाला आवर घातला.
उत्तररात्री नागरिकांना सावध केले
धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे खडकवासल्यातून बुधवारी मध्यरात्री पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. ही माहिती नागरिकांना कशी देणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. रात्री बारा ते सकाळी सहा ध्वनिवर्धकाला परवानगी नाही. मात्र, हा तातडीचा सावधगिरीचा इशारा टिळक चौकातील ध्वनिवर्धकावरून देण्यात आला. पाणी सोडले जात असल्यामुळे भिडे पूल परिसरात ज्या नागरिकांची वाहने आहेत त्यांनी ती तातडीने काढून घ्यावीत, असा संदेश रात्री अडीच वाजता नागरिकांना देण्यात आला.