निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव न पाठविण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एकात्मक आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी, सह प्रकल्प अधिकाऱ्यासह तिघांना सोमवारी रंगेहात पकडले. त्याच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकल्प अधिकारी नीलेश भागचंद्र अहिरे (वय २८), ललित गोविंद धर्माधिकारी (वय २७, रा. दोघेही- एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, ता. आंबेगाव) आणि गृहपाल मनोज नामदेव शिवपूरकर (वय ४०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शकुंतला दगडोबा चव्हाण (वय ३३, रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण या नवी सांगवी येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल म्हणून काम करतात. सप्टेंबर २०१३ रोजी आदिवासी राज्यमंत्री यांनी वसतिगृहात भेट दिली होती. त्या वेळी अहिरे यांनी मंत्र्याच्या भेटीच्या वेळी नीट व्यवस्था ठेवली नाही म्हणून कारणे दाखवा नोटीस काढली होती. त्याला चव्हाण यांनी लेखी उत्तर दिले होते. त्यावर अहिरे यांनी चव्हाण यांना ‘तुमच्या चुका गंभीर असून तुमच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविणार आहे’ असे सांगितले. त्यावर चव्हाण यांनी असे करू नका म्हणून विनंती केली होती. त्यानंतर चव्हाण यांच्या पतींना अहिरे यांच्या चालकाने फोन करून तुमच्या पत्नीच्या निलंबनाचा प्रस्ताव न पाठविण्यासाठी साहेब पन्नास हजार रुपये मागत असल्याचे फोन केला होता. त्यानंतर चव्हाण यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अशोक भारती या अधिक तपास करत आहेत.