येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात गेल्या आठवडय़ात एका मनोरुग्णाकडून दोन मनोरुग्णांच्या झालेल्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर रुग्णालयाच्या परिसरात ३९ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ई टेंडरिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. नवीन रुग्ण दाखल कक्ष (ऑब्झव्‍‌र्हेशन वॉर्ड), रागाच्या भरात इतरांना धोका पोहोचवण्याचा इतिहास असलेल्या रुग्णांसाठीचा कक्ष (अक्यूट वॉर्ड), इतर काही वॉर्ड्स, रुग्णालयाची दोन्ही प्रवेशद्वारे, गॅस टँक या जागांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांनी दिली.
मागील बुधवारी रात्री मनोरुग्णालयातील एका रुग्णाने रागाच्या भरात इतर दोन मनोरुग्णांची हत्या केली होती. या घटनेची अंतर्गत चौकशी करण्यासाठी रुग्णालयाने तीन डॉक्टरांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने सोमवारी आपला अहवाल अधीक्षकांना सादर केला आहे. रुग्णालयातील ब्रदर्स व अटेंडंटस्ची संख्या वाढवली जावी, रुग्णालयात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत आणि व्यसनाधीन व रागाच्या भरात दुसऱ्याला धोका पोहोचवू शकणाऱ्या रुग्णांना वेगळ्या खोलीत ठेवण्यासाठी अधिक खोल्या बांधाव्यात, अशा सूचना या समितीच्या अहवालात करण्यात आल्या आहेत.
डॉ. भैलुमे म्हणाले, ‘‘रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी ई- टेंडरिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही टेंडरिंग प्रक्रिया सुमारे एक महिना चालेल. हत्येच्या घटनेपूर्वी आरोपी मनोरुग्णाची मानसिक स्थिती स्थिर असल्यामुळे त्याला वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. मानसिक स्थिती स्थिर असेल तर मनोरुग्णांना वेगळे ठेवले जात नाही. रुग्ण उत्तेजित झाल्यास त्याला इंजेकशने व गोळ्या देऊन वेगळे ठेवण्यासाठी विशिष्ट खोल्या हव्यात अशी सूचना चौकशी समितीने केली आहे. हा अहवाल उपसंचालकांना पाठवण्यात येणार आहे.’’
आरोग्य उपसंचालकांतर्फेही रुग्णालयातील हत्या प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर एक चौकशी समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल येणे बाकी आहे.