खडकवासला आणि पवना धरणात पोहण्यासाठी उतरलेले चार तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. खडकवासला धरणात बुडालेल्या तरुणांचे मृतदेह सापडले. मात्र, पवना धरणात बुडालेल्यांचे मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत सापडले नव्हते.

फिरोज तजउद्दीन नदाफ (वय १९) आणि वाजीद हुजुरअली सय्यद (वय १८, दोघे रा. खान वस्ती, वारजे माळवाडी) अशी खडकवासला धरणात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. फिरोज, वाजीद आणि त्यांचे दोन मित्र रविवारी दुपारी खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेले होते. दुपारी साडेचारच्या सुमारास चौघे जण धरणात पोहण्यासाठी उतरले. फिरोज आणि वाजीद बुडाल्याचे त्यांच्या मित्रांनी पाहिले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती खडकवासला धरणालगत असलेल्या चौपाटीवर असलेल्या नागरिकांना दिली. नागरिकांनी फिरोज आणि वाजीद याला पाण्यातून बाहेर काढले. नाका-तोंडात पाणी गेल्याने दोघे बेशुद्ध पडले होते. त्यांच्यावर काठावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तातडीने दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच दोघे मरण पावले होते.

खडकवासल्यातील घटनेनंतर संध्याकाळी मावळ तालुक्यात पवना धरण भागात पर्यटनासाठी आलेले दोन महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना घडली. जितेश पगारे (वय १९, मूळ रा. नाशिक, सध्या रा. कर्वेनगर) आणि अनिकेत निकम (वय २०, मूळ रा. धुळे, सध्या रा. सिंहगड इन्स्टिटय़ूट, लोणावळा) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. अनिकेत, जितेश आणि त्यांच्यासोबत असलेले चार मित्र ब्राह्मणोली भागात फिरायला आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारात जितेश आणि अनिकेत पाण्यात उतरले. खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तसेच शिवदुर्ग संस्थेच्या पथकाकडून दोघांचा शोध घेण्यात आला. अंधार झाल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली.

धरणाच्या परिसरात गस्त घालण्याची मागणी

खडकवासला धरणालगत रविवारी मोठी गर्दी असते. पर्यटक पाण्यात उतरतात. यापूर्वी खडकवासला धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळी सुट्टीमुळे या भागात गर्दी होत असते. धरणाच्या पाण्यात उतरणाऱ्या उत्साही पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी खडकवासला चौपाटीच्या भागात पोलिस तसेच पाटबंधारे खात्याचा कर्मचाऱ्यांनी गस्त घालावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.