देशात सुमारे ७० टक्के ज्येष्ठ नागरिकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे अत्याचार होत असून, त्यापैकी केवळ दीड टक्के प्रकरणेच पोलिसांपर्यंत पोहोचतात. वृद्ध आई-वडिलांचा जाच करण्यामध्ये केवळ मुलगा आणि सून हेच नाहीत तर ज्येष्ठ नागरिकांचा छळ करण्यामध्ये मुलीदेखील आघाडीवर आहेत.
हे निष्कर्ष आहेत ‘जागतिक वृद्ध अत्याचारविरोधी दिना’च्या निमित्ताने ‘हेल्पेज इंडिया’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचे! या सर्वेक्षणानुसार सुनांमार्फत ३९ टक्के, तर मुलांकडून अत्याचार होण्याचे प्रमाण ३८ टक्के आहेत. तर १७ टक्के मुलीदेखील यामध्ये अंतर्भूत आहेत. यानिमित्ताने दोन पिढय़ांमध्ये संवाद होण्याची गरज आहे, असे मत सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.
ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करण्यापासून त्यांना घरातल्या एखाद्या खोलीत अथवा गॅलरीत डांबून-बांधून ठेवणे, अपमानास्पद वागणूक देणे, जेवण न देणे, नोकर म्हणून राबवणे, मालमत्ता नावावर करीत नसल्यामुळे व इतर कारणांनी टोचून बोलणे अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार होतात. मानसिक खच्चीकरण करण्यापासून शारीरिक इजादेखील केली जाते. ज्येष्ठांवरील या अत्याचारांसाठी स्वमदत गटांची स्थापना जशी होण्याची गरज आहे, तसेच ज्येष्ठ नागरिक संघांमधूनदेखील त्यांना पाठिंबा मिळाला, तर असे अत्याचार थांबू शकतात.
लहान मुलांप्रमाणे अनेक ज्येष्ठांची वृत्ती हट्टी, हेकेखोर असते. त्याबरोबरच पूर्वीचेच हक्क आपल्याला घरात मिळावेत अशी त्यांची अपेक्षा असते. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवरून कुरबूर करणे हा आपला हक्क असल्यासारखे काही ज्येष्ठ मंडळी वागत असतात. आजच्या काळामध्ये ज्येष्ठांचे आयुर्मान वाढले आहे. याबरोबरच ज्येष्ठांना परावलंबित्व पत्करावे लागत असून त्यामुळे त्यांना आणि तरुणांना तडजोड करावी लागते आहे, या सगळ्या गोष्टींपासून दूर राहून ज्येष्ठांनी आणि तरुणाईने एक पाऊल पुढे टाकले, ज्येष्ठांनी तरुणाईला समजून घेण्याची आणि तरुणाईने उद्या आपणही ज्येष्ठ होणार आहोत, ही भावना जर ठेवली तर उद्याची पहाट नवा आनंद घेऊन येईल हे नक्की.