जुलैमध्ये राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याबाबत निर्माण झालेली चिंता ऑगस्टमध्ये बहुतांश प्रमाणात दूर झाली आहे. राज्यातील पाऊस आता सरासरीपेक्षा १७ टक्क्य़ांनी अधिक असून, त्यामुळे छोटे-मोठे सर्वच प्रकल्प पाणीदार झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील सर्व प्रकल्पांत मिळून ३० ऑगस्टपर्यंत ७६.५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत १३ टक्क्य़ांनी अधिक आहे.

राज्यात जुलै महिन्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी चांगल्या पावसाची हजेरी होती. मराठवाडय़ात पावसाचे प्रमाण अधिक होते. मात्र, या काळात मध्य महाराष्ट्रातील सर्वच विभाग आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. सर्वाधिक पावसाच्या विभागांत पाऊस कमी झाल्याने मुंबई, पुण्यासारख्या शहरांना पाणीपुरवठा होत असलेल्या धरणांतही अपुरा पाणीसाठा होता. एकूणच उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विभागातील पालघर, ठाणेसह इतर काही जिल्ह्यांत पाऊस कमी झाल्याने या भागातही पाण्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून झालेल्या जोरदार पावसाने ही चिंता बहुतांश प्रमाणात दूर केली आहे. ऑगस्टमध्ये मराठवाडा वगळता इतरत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक छोटय़ा-मोठय़ा धरणांतून विसर्गही करण्यात आला. गेल्या तीन दिवसांत विदर्भात मुसळधार पाऊस झाला. परिणामी पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ झाली आहे. राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागांतील एकूण प्रकल्पांत ३० ऑगस्ट २०१९ रोजी ६३.७१ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ७६.५३ टक्के झाला आहे. अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर विभागांमध्ये गतवर्षीतच्या तुलनेत सर्वाधिक पाणी जमा झाले आहे.

विभागनिहाय पाणीसाठा

विभाग——— सध्याचा साठा——गतवर्षीचा साठा

अमरावती——६९.५५ टक्के———३२.७२ टक्के

औरंगाबाद—–६३.१४ टक्के———२९.४९ टक्के

नागपूर———७८.०६ टक्के——–५१.६९ टक्के

कोकण——–८१.०५ टक्के———८७.६६ टक्के

नाशिक——–७२.१७ टक्के———६७.४१ टक्के

पुणे———–८४.०५ टक्के———८५.४९ टक्के

एकूण———७६.५३ टक्के———६३.७१ टक्के

१०० टक्के भरलेली धरणे

राज्यातील मोठय़ा प्रकल्पांमध्येही सध्या समाधानकारक पाणीसाठा जमा होतो आहे. कोयना प्रकल्पात ९५.२५ टक्के, जायकवाडीमध्ये ८७.९६ टक्के, तर उजनी धरणात सध्या ९३.७६ टक्के पाणीसाठा आहे. वारणा ९६.७३ टक्के आणि इसापूर (यवतमाळ) ९१ टक्के पाणी जमा झाले आहे. हिंगोलीतील येलदरी, पालघरमधील धामणी, कवडास, भंडाऱ्यातील बावनथडी, चंद्रपूरमधील असोळमेंढा, गडचिरोलीतील दिना, नगरमधील भंडारदरा, नाशिकमधील कडवा, भाम, पुण्यातील पानशेत, वरसगाव, खडकवासला आदी धरणांमध्ये सध्या शंभर टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगलीतील बहुतांश प्रकल्पात ९० टक्क्य़ांहून अधिक पाणीसाठा आहे.