भोसरीमधील ‘एमएम ग्रुप’ नामक गुन्हेगारी टोळीच्या मुख्य सुत्रधाराचा खून त्याच्याच टोळीतील सदस्यांनी केल्याची घटना भोसरी येथे घडली आहे. दरम्यान, या खूनप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत्यू झालेला मयूर मडके हा सराईत गुन्हेगार असून तो एमएम नावाच्या ग्रुपचा मुख्य सूत्रधार होता. या ग्रुपमधील सर्वच सदस्य हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. मयूर मडके आणि मंगेश मोरे या दोघांच्या नाव आणि आडनावाच्या अद्याक्षरातून या ग्रुपचे नामकरण करण्यात आले होते. या ग्रुपमधल्या काही जणांनी आपल्या हातावर एमएम असा टॅटूही काढून घेतला होता. पण या ग्रुपचं नाव कोणावरुन पडलंय यावरून मयूर आणि मंगेश यांच्यामध्ये वाद सुरू झाला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन काल मध्यरात्री आरोपी मंगेश मोरे इतर साथीदारांना घेऊन मयूरसोबत चर्चा करण्यासाठी गेला. तिथे चर्चेदरम्यान त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मंगेशसह इतर साथीदारांनी मयूर मडकेवर कोयत्याने वार करत त्याला ठार मारले.

आरोपींना फिल्मीस्टाईलने पकडले

मुख्य आरोपी मंगेश मोरेसह इतर पाचही आरोपी लातूरला पळून जाणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सुमीत देवकर आणि सुमीत रासकर यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी एक पथक तयार करुन आरोपींना सोलापूर हायवेवर सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. अटकेनंतर या आरोपींनी भोसरी पोलिसांत गुन्ह्याची कबुली दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, आशिष गोपी, संतोष महाडिक यांनी या कारवाईत भाग घेतला.