माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ४३ जणांना जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी अपात्र ठरविण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून, याबाबत मुंबई उच्च न्यायालयातील दुसऱ्या प्रकरणाचा निकाल २१ मार्चला लागणार असून, त्यानंतर संबंधितांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे अजित पवारांसह विविध जिल्ह्य़ांच्या बँकांवर संचालक असणाऱ्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या मंडळींचे पद धोक्यात आले आहे.
सहकारी बँकांमधील अर्थिक अनियमिततेच्या कारणास्तव रिझव्र्ह बँकेच्या निर्देशांनुसार बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळातील व्यक्तींना पुढील दहा वर्षे निवडणुकांसाठी बंदी घालणे व सध्या इतर सहकारी बँकेत संचालक असल्यास ते अपात्र ठरविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटपातील गैरप्रकारांबाबत रिझव्र्ह बँकेने कारवाई करीत २००१ मध्ये बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. या संचालक मंडळात अजित पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचाही समावेश होता.
राज्य सहकारी बँकेचे प्रकरण व मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा निबंधकांनी पवार, मोहिते-पाटील, आमदार दिलीप सोपल यांच्यासह विविध जिल्ह्य़ातील सहकारी बँकांत संचालकपदी असलेल्या ४३ संचालकांवर अपात्रतेची कारवाई करण्याच्या प्रक्रिया सुरू करून जानेवारीपासून कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यातील बहुतांश मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आहेत. अजित पवार यांना १८ फेब्रुवारीला नोटीस बजावण्यात आली होती. जिल्हा सहनिबंधकांपुढे त्यांची १४ मार्चला सुणावणी होती. त्यात त्यांची बाजू मांडली जाणार होती. मात्र, न्यायालयातील प्रकरणामुळे ही बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
अपात्रतेच्या कारवाईस स्थगिती देण्याबाबत काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्याचप्रमाणे मंत्रीमंडळाने घेतलेला अपात्रतेबाबतचा निर्णय व याच प्रकरणाशी संबंधित विविध विषयांवर काहीजण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. त्याचा निकास २१ मार्चला लागणार आहे. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, २१ मार्चला न्यायालयाच्या निर्णयाची शासनाला प्रतीक्षा आहे. त्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.