तऱ्हेवाईक पुणेकरांमुळे घरपोच आधार सेवा देताना प्रशासनाची दमछाक

पुणे : प्रत्यक्ष आधार केंद्रांवर येऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणिअपंगांसाठी प्रत्यक्ष घरी जाऊन आधार नोंदणी आणि आधार कार्डमधील दुरुस्तीची कामे करण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केली आहे. परंतु, नियोजित वेळ ठरवूनही कागदपत्रे शोधून न ठेवणे, सेवा देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना घराबाहेर तासनतास थांबवणे, ज्या व्यक्तीची आधार नोंदणी किंवा दुरुस्ती करायची आहे, ती व्यक्तीच उपलब्ध नसणे, अशा विविध समस्यांना आधार सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे घरपोच आधार सेवा देताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ात ९५ टक्क्य़ांपेक्षा अधिक आधार नोंदणी झाली आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, प्राप्तिकर विवरण, बँक खाते, मोबाईल सीमकार्ड अशा सर्व ठिकाणी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आधार कार्ड न घेतलेल्या उर्वरित नागरिकांची आधार नोंदणी आणि आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी आधार केंद्रांवर नागरिकांची गर्दी होते. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची परवड होऊ नये म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी घरपोच सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेसाठी आतापर्यंत सहाशे नागरिकांनी अर्ज केले होते. त्यांपैकी पाचशेपेक्षा अधिक नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे.

ज्या ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि अपंगांना आधार नोंदणीसाठी महा ई सेवा केंद्र किंवा आधार नोंदणी केंद्रांमध्ये पायी चालत जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी सशुल्क घरपोच सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शासनाच्या नियमानुसार शुल्क आकारले जाते. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कार्यालयीन वेळेनंतर प्रत्यक्ष घरी जाऊन कामे केली जात आहेत. त्याकरिता विशेष यंत्रांची सोय डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात आली आहे. तसेच घरपोच सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक महा ई सेवा केंद्रांची मदत घेतली जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा टपाल विभाग, विशिष्ट ओळख प्राधिकरण (युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया – यूआयडीएआय) आणि आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करता येतात. दिवसाला २५ नागरिकांना घरपोच आधार सेवा देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अर्ज प्राप्तीनंतर त्याची शहानिशा करणे व पत्ता शोधल्यानंतर पाच दिवसांत आधार दिले जाते.

घरपोच सेवा देताना समस्या अशा..

नागरिकांनी घरपोच आधार सेवा मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जाची शहानिशा करण्यात येते. त्यानंतर घरपोच सेवेसाठी अर्ज योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित नागरिकाला दूरध्वनी करून सेवा देण्यासाठी त्यांच्या सोयीची तारीख निश्चित करण्यात येते. परंतु, नियोजित तारखेला सेवा देण्यासाठी कर्मचारी गेल्यानंतर त्यांना तासनतास घराबाहेर उभे करणे, ज्या व्यक्तीचे आधारचे काम करायचे आहे, ती व्यक्तीच उपलब्ध नसणे, काम करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसणे, पत्ता नीट न देणे, घरपोच सेवा दिल्यानंतर शुल्कावरून वाद घालणे अशा विविध समस्या कर्मचाऱ्यांना येत आहेत.