बारावीचे निकाल वाढल्यामुळे पहिल्या यादीतील प्रवेशासाठी पुण्यातील महाविद्यालयांमधील स्पर्धा या वर्षी शिगेला पोहोचणार आहे. या वर्षी पुण्यातील महाविद्यालयांचे कट ऑफ दीड ते दोन टक्क्य़ांनी वाढणार आहेत.
शहरातील महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी बहुतेक महाविद्यालयांमध्ये गर्दी केली होती. बारावीचा निकाल गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी सर्वाधिक लागला आहे. त्यामुळे या वर्षी पुण्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीची स्पर्धा शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत. सर्वच महाविद्यालयांचे कट ऑफ या वर्षी दीड ते दोन टक्क्य़ांनी वाढू शकतात, असा अंदाज महाविद्यालयांच्या प्राचार्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. विज्ञान शाखेत पहिल्या यादीत प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा जास्त असेल. मात्र, त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या की विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रियेवरील ताण कमी होईल.
वाणिज्य आणि कला शाखेसाठी मात्र, स्पर्धा अधिकच वाढणार आहे. या दोन्ही शाखांमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढे इतर कोणते अभ्यासक्रम चोखाळण्यापेक्षा पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल जास्त असतो. त्याचप्रमाणे बारावीच्या निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या संख्येत फार फरक पडलेला दिसत नाही. साधारण ५५   ते ७५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणे वाढल्यामुळे कला आणि वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठीची स्पर्धा वाढली आहे.
पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येण्याकडे विद्यार्थ्यांचा अनेक वर्षे कल आहे. मात्र, या वर्षी मुळातच महाविद्यालयातूनच उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा शाळांशी जोडल्या गेलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी महाविद्यालयाकडील जागा कमी होणार आहेत. सध्या प्रथम वर्षांच्या जागा वाढवून मिळण्याची मागणी शासनस्तरावर केली जात असली, तरी अद्याप प्रवेश क्षमता वाढवून मिळालेली नाही. त्यामुळे आपल्या महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देऊन उरलेल्या जागांवर महाविद्यालयांना बाहेरील विद्याथ्र्र्याना प्रवेश देता येणार आहे.
व्यवस्थापन कोटय़ाचा भाव वधारणार..
प्रवेशासाठी वाढलेल्या स्पर्धेमुळे महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कोटय़ाच्या किमती यंदा वाढणार आहेत. गेली अनेक वर्षे कला शाखेला विद्यार्थी मिळत नव्हते. पण या वर्षी अगदी कला शाखेतील प्रवेशासाठीही काही महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोटय़ाचा भाव वाढण्याची शक्यता आहे.
छोटी महाविद्यालये खुष
दरवर्षी मोजक्याच महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी झुंबड उडालेली दिसते, तर दुसरीकडे छोटय़ा महाविद्यालयांना अनेक शाखांसाठी विद्यार्थी शोधण्याचीच वेळ येते. या वर्षी मात्र उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे छोटय़ा महाविद्यालयांनाही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.