News Flash

लोकांना आवडणार नाहीत, असे निर्णय घेऊ नका

विमाननगर परिसरात महापालिकेने बांधलेल्या स्केटिंग रिंगला राष्ट्रवादी नगरसेवकाच्या नातेवाईकाचे नाव देण्यावरून सुरू झालेल्या वादाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्थानिक नगरसेवकांना फैलावर घेतले.

| September 6, 2014 02:45 am

विमाननगर परिसरात महापालिकेने बांधलेल्या स्केटिंग रिंगला राष्ट्रवादी नगरसेवकाच्या नातेवाईकाचे नाव देण्यावरून सुरू झालेल्या वादाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्थानिक नगरसेवकांना फैलावर घेतले. शहरात अशी नावे देताना लोकांना जे आवडणार नाही, अशी कामे करू नका, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना पक्षबैठकीत समज दिली.
महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या पक्षाच्या नगरसेवकांबरोबर एकत्रित चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महापौरांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाव देण्यावरून सुरू झालेल्या वादाचीही दखल दादांनी घेतली. विमाननगर येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्केटिंग रिंगचे उद्घाटन गेल्या महिन्यात पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक महादेव पठारे यांनी या स्केटिंग रिंगला नाव देण्याचा जो प्रस्ताव दिला आहे त्यावरून वाद सुरू झाला आहे. या नावाला स्थानिक रहिवाशांनी तसेच स्थानिक विमाननगर ज्येष्ठ नागरिक संघाने तीव्र विरोध केला आहे. या वादाचा दाखला देत बैठकीत पवार यांनी पठारे यांना सुनावले.
तुम्ही प्रभागात एखादे काम केलेत, तर त्याला नातेवाईकाचे नाव द्या; पण महापालिकेतर्फे जे मोठे प्रकल्प शहरात केले जातात त्यांना नातेवाईकांची नावे देताना स्थानिक नगरसेवकांच्या नातेवाईकांची नावे देणे चुकीचे आहे. मोठय़ा प्रकल्पांना नावे देताना आपणच एखाद्या नावाचा आग्रह धरण्यापेक्षा सर्वाना विचारात घेऊन, सर्वाची संमती घेऊन नावे देण्याचे निर्णय घ्या, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
इच्छुक नगरसेवकांची निवेदने
पुण्याच्या महापौरपदासाठी १५ सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून त्यासाठी राष्ट्रवादीने अर्ज मागवले होते. त्यानुसार पक्षाकडे सहा अर्ज आले असून या सर्वाना शुक्रवारी बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. शहराध्यक्ष, खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार बापू पठारे, अनिल भोसले, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, सभागृहनेता सुभाष जगताप, कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, सुनील बनकर तसेच अन्य पदाधिकारी व नगरसेवक बैठकीत उपस्थित होते. महापौरपद दिल्यास शहरासाठी काय काम करणार याबाबत प्रत्येक इच्छुकाला यावेळी निवेदन करण्यास सांगण्यात आले. नगरसेवक दत्ता धनकवडे, बाबूराव चांदेरे, विकास दांगट, प्रशांत जगताप, बाळासाहेब बोडके आणि सचिन दोडके यांनी महापौरपदासाठी पक्षाकडे अर्ज केले आहेत. या निवडणुकीसाठी १० सप्टेंबर रोजी महापालिकेत अर्ज भरायचे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 2:45 am

Web Title: admonish to corporator by ajit pawar
टॅग : Corporator,Meeting,Ncp
Next Stories
1 विद्यार्थ्यांना सक्ती नको, मुक्ती हवी- अजित पवार
2 पुणे जिल्ह्य़ातील धरणे फुल्ल!
3 आत्महत्येपासून परावृत्त करणारी हेल्पलाईन
Just Now!
X