राहुल खळदकर

गेल्या काही वर्षांत भारतीय बासमती तांदळाने परदेशातील बाजारपेठ काबीज केली असून आखाती देश, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशात भारतीय बासमतीची निर्यात मोठय़ा प्रमाणावर होते. बासमती निर्यातीच्या माध्यमातून देशाच्या गंगाजळीत मोठी भर पडत असली, तरी कीटकनाशकांचा वापर भारतीय बासमतीच्या मुळावर आला आहे. युरोप, इराण, इराक या देशांनी कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे भारतीय बासमतीची आयात यापूर्वीच थांबविली आहे. त्यापाठोपाठ आता आफ्रिका खंडातील देशांनी भारतीय बासमती नाकारला आहे.

भारतातून बासमती आणि बिगर बासमती या तांदळाची मोठय़ा प्रमाणावर निर्यात केली जाते. परदेशात पाठविण्यात येणाऱ्या बासमती तांदळावर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. परदेशात बासमती पोहोचण्यास साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधी लागतो. या कालावधीत बासमती तांदळाला कीड लागू नये म्हणून उत्तरेकडील राज्यातील बासमती उत्पादक शेतकरी कीटकनाशकांचा वापर करतात.

कीटकनाशकांचा वापर अपायकारक असल्याने युरोपातील देशांनी भारतीय बासमतीची आयात थांबविली आहे, तसेच इराणबरोबर आपला निर्यात करार  न झाल्याने इराणनेही बासमतीची आयात थांबविली आहे. कीटकनाशकांच्या वापरामुळे युरोपपाठोपाठ आता आफ्रिकेने भारतीय बासमतीची आयात थांबविली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे (फॅम) वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मार्केटयार्डातील जयराज कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी दिली.

एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात २.५ टक्क्यांनी कमी झाली. युरोपमधील अन्नधान्य प्रशासनाने खाद्यपदार्थ र्निजतुक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांसंबंधीच्या नियमावलीमध्ये बदल केला आहे. त्यांनी बासमतीच्या आयातीवर बंधने आणली आहेत.

इराणबरोबरचा निर्यात करार साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यादरम्यान होतो. परंतु भारताने इराणकडून खनिज तेलांच्या आयातीवर निर्बंध आणल्याने इराणने बासमती तांदळाच्या आयातीवर बंधने आणली आहेत, असेही शहा यांनी सांगितले.

यंदाच्या हंगामात बासमतीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. युरोप, ऑस्ट्रेलिया, आखाती देश, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांकडून भारतीय बासमतीला मोठी मागणी असते. कीटकनाशकांच्या वापरामुळे युरोपने भारतीय बासमती नाकारला असून आफ्रिकेनेही आता हेच कारण पुढे केले आहे. त्यामुळे जहाजाद्वारे पाठविण्यात येणारे बासमतीचे कंटेनर सध्या युरोप आणि आफ्रिकेतील बंदरात पडून आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बिगर बासमतीबाबत कठोर नियम नाही

युरोपने कीटकनाशकांचा वापर केलेल्या बासमतीची आयात थांबविली आहे. त्या तुलनेत परदेशात भारतातील ब्राऊन बासमतीला (पॉलिश न केलेला) चांगली मागणी आहे. ब्राऊन बासमती तांदळावर प्रक्रिया करुन युरोपात त्याची विक्री केली जाते. या उद्योगात अनेक अनिवासी भारतीय आहेत. अमेरिकेत तर भारतातील बासमतीच्या दावत, कोहिनूर, इंडिया गेट या ब्रँडना चांगली मागणी असते. बिगर बासमती तांदळाबाबत परदेशात कठोर नियमावली नाही. इंद्रायणी, आंबेमोहोर तांदळालाही परदेशातून चांगली मागणी आहे.

आफ्रिका खंडात पाच टक्के निर्यात

आफ्रिकेने कीटकनाशकांच्या वापरामुळे भारतीय बासमती नाकारला आहे. एकूण निर्यातीपैकी चार ते पाच टक्के बासमती आफ्रिका खंडातील देशात पाठविला जातो. देशातून साधारण ४० लाख टन बासमती तांदळाची निर्यात केली जाते. सर्वाधिक २० ते २४ लाख टन बासमती निर्यात आखाती देशात होते. युरोप आणि अमेरिकेत १२ लाख टन बासमती पाठविला जातो. ऑस्ट्रेलियात चार लाख टन बासमती पाठविला जातो. उर्वरित बासमती आफ्रिका खंडातील देशात पाठविला जातो. निर्यातीसाठी ११२१ बासमती, शेला, स्टीम, ब्राऊन बासमती पाठविला जातो. त्यापैकी २४ लाख टन ११२१ जातीच्या बासमतीची निर्यात केली जाते. १० लाख टन स्टिम बासमती, चार लाख टन ब्राऊन बासमती, तसेच दोन लाख टन पारंपरिक बासमती परदेशात पाठविला जातो. बिगर बासमतीची निर्यात साधारण ७५ ते ८० लाख टन एवढी होते. बासमती तांदळाच्या निर्यातीतून २५ हजार कोटी रुपयांची भर गंगाजळीत पडते.