गोवंश हत्या बंदी कायद्याला रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने विरोध केला असून, हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी मंगळवारी राज्यभरात निदर्शने केली जाणार आहेत. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. शहराध्यक्ष महेंद्र कांबळे तसेच डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे, मोहन जगताप, संगीता आठवले आदी त्या वेळी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचा महायुतीमध्ये समावेश असला तरी या कायद्यामुळे समाजातील विविध घटकांवर अन्याय होणार असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांच्या सूचनेनुसारच त्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
राज्यात १९७५ पासून गो हत्या बंदाचा कायदा लागू असताना शासनाने पुन्हा नव्याने गोवंश बंदी हत्या कायदा आवश्यकता नसताना लागू केला आहे. गाईची हत्या करण्यास सर्वाचाच विरोध आहे. गाईचे महत्त्व समाजातील सर्व घटकांना ज्ञात आहे. त्यामुळे पूर्वीच्या गो हत्या बंदी कायद्यास आपचा विरोध नाही. मात्र, नव्याने केलेल्या गोवंश हत्या बंदीच्या या कायद्यामुळे शेतकरी, चर्मकार समाज, कुरेशी समाज, चर्मोद्योगावर अवलंबून असणारी मंडळी व बीफ सेवन करणाऱ्या एका मोठय़ा समाजावर अन्याय होणार आहे. भाकड जनावरांचे करायचे काय, हा प्रश्न निर्माण होईल. ही जनावरे एकतर रस्त्यावर फिरताना किंवा मृतावस्थेत दिसून येतील. त्यामुळे आरोग्याचे प्रश्नही निर्माण होतील. त्यामुळे हा कायदा रद्द करावा, ही आमची मागणी असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.