मराठी साहित्याच्या प्रसारामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकक्षेमध्ये नवी मुंबई आणि बेळगाव या शाखांना सामावून घेण्याच्या सूचनांचा अंतर्भाव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात येणार आहे. अन्य भाषक साहित्य संस्था आणि चळवळींना आवश्यकतेनुसार सहकार्य करण्याचा मुद्दाही समाविष्ट करण्यात आला आहे.
परिषदेच्या घटना दुरुस्ती समितीची प्राथमिक बैठक रविवारी झाली. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य या घटना दुरुस्ती समितीच्या अध्यक्षा असून प्रा. सु. प्र. कुलकर्णी निमंत्रक आहेत. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह पां. के. दातार, प्रभाकर संत, राजन मुठाणे, अॅड. जे. जे. कुलकर्णी आणि डॉ. कल्याणी दिवेकर हे समिती सदस्य बैठकीस उपस्थित होते. या समितीची पुढील बैठक रविवारी (७ जुलै) होणार आहे. घटनेतील नव्या बदलांना परिषदेच्या कार्यकारिणीची आणि सर्वसाधारण सभेची मान्यता घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्तांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश पायगुडे यांनी दिली.
संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये मराठी भाषेवरील अन्याय निवारणासाठी प्रयत्न करावेत, साहित्य आणि साहित्यिकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहावे, या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आजीव सभासद शुल्क एक हजार रुपयांवरून दुप्पट करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून मराठी भाषा-साहित्य आणि समाजाच्या विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना सन्माननीय सभासद करून घ्यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.