करोना विषाणूचा संसर्ग झाल्यास आजार लपवून ठेवू नका, घाबरूनही जाऊ नका. आजारास सामोरे जाऊन डॉक्टरांच्या सूचनेचे पालन केल्यास करोना पूर्णपणे बरा होतो, असा अनुभव करोनामुक्त झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील एका युवकाने सांगितला. मात्र, करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वानी खबरदारी घ्यावी, सरकारच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्याने केले.

हा तरुण फिलिपाईन्स येथे उच्च शिक्षणासाठी गेला होता. तेथील करोनाचा प्रादुर्भाव पाहून त्याच्या कुटुंबीयांनी घरी परतण्याचा आग्रह धरला. त्यानुसार, १७ मार्चला हा तरुण शहरात परतला. त्यावेळी खोकला येत असल्याने तो नेहमीच्या डॉक्टरकडे गेला. त्यांना करोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला करोनाची चाचणी करून घेण्यास सांगितले. पिंपरी पालिकेने करोनासाठी स्थापन केलेल्या केंद्रात तो गेला. तपासणीत त्याला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, १४ दिवसांसाठी त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. उपचारांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला. नुकतेच त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

‘‘करोना झाल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा मनात बरीच भीती होती. मात्र, उपचार आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन केले तर आजार बरा होतो, यावर विश्वास होता. त्यामुळे डॉक्टरांना पूर्ण सहकार्य केले. त्यांच्या सूचनांचे पालन केले, पथ्य पाळले. पूर्णपणे करोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले’’, असे या तरुणाने सांगितले.

घरात सर्वाना अलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. आता मलाही घरी सोडण्यात आले असले तरी १४ दिवस घरीच अलगीकरणात राहावे लागणार आहे. त्याचेही मी पालन करणार असून, डॉक्टरांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे त्याने सांगितले.

नागरिकांनी हा आजार लपवू नये. लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी. अन्यथा, याचा

संसर्ग वेगाने होऊ शकतो. नागरिकांनी बाहेर पडू नये. गर्दीत जाऊ नये. शासकीय यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. ते आपल्या हितासाठीच आहे, असा सल्लाही या तरुणाने दिला.