02 March 2021

News Flash

डॉ. ढेरे म्हणजे संस्कृती व लोककला यांचा समन्वय साधणारा ज्ञानतपस्वी

डॉ. धनागरे म्हणाले, ध्यासवर्ती, ज्ञानवर्ती आणि वस्तुनिष्ठ संशोधक असे वर्णन अण्णांच्या बाबतीत करता येईल.

डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे डॉ. ढेरेलिखित ‘श्रीनरसिंहोपासना-उदय आणि विकास’ या ग्रंथाचे प्रकाशन नामवंत पुरातत्त्वज्ञ डॉ. म. के. ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. अरुणा ढेरे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. द. ना. धनागरे, डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश खांडगे यावेळी उपस्थित होते.

डॉ. द. ना. धनागरे यांची भावना

संशोधनपर लेखनातून निखळ आनंद व समाधान शोधणारा एक ज्ञानवर्ती म्हणजे डॉ. रा. चिं. ढेरे उर्फ अण्णा. लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोकदेवतांचा अभ्यास करण्याची संस्कृती त्यांनी जपली आणि महाराष्ट्रभर पसरलेल्या लक्ष्मीच्या रूपांमधील साम्य आणि समान प्रवास यांचा शोध घेताना संस्कृती आणि लोककला यांचा समन्वयही त्यांनी साधला. हा समन्वय साधणारे डॉ. ढेरे खऱ्या अर्थाने ज्ञानतपस्वीच होते, अशा शब्दांत विख्यात समाजशास्त्रज्ञ डॉ. द. ना. धनागरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्रातर्फे डॉ. ढेरे लिखित ‘श्रीनरसिंहोपासना-उदय आणि विकास’ या ग्रंथाचे प्रकाशन नामवंत पुरातत्त्वज्ञ डॉ. म. के. ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. डॉ. ढेरे यांच्यावरील ‘समन्वय’ या गौरवांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. डॉ. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, तसेच डॉ. तारा भवाळकर, डॉ. रमेश जाधव, डॉ. प्रकाश खांडगे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. डॉ. ढेरे यांच्याशी कामाच्या निमित्ताने जोडले गेलेले वाङ्मयीन क्षेत्रातील डॉ. भवाळकर, डॉ. जाधव आणि डॉ. खांडगे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमानंतर डॉ. ढेरे यांच्या निवडक साहित्यावर आधारित ‘लौकिक आणि अलौकिक’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. माधुरी पुरंदरे, ज्योती सुभाष, जितेंद्र जोशी, हर्षद वेदपाठक आणि कल्याणी देशपांडे यांनी अभिवाचनात सहभाग घेतला होता.

डॉ. धनागरे म्हणाले, ध्यासवर्ती, ज्ञानवर्ती आणि वस्तुनिष्ठ संशोधक असे वर्णन अण्णांच्या बाबतीत करता येईल. आपल्या शोधकार्यातून आर्थिक लाभ किती होणार, याचा विचार त्यांनी कधीही केला नाही. ग्रंथप्रसिद्धी हक्कासाठी लेखकाला मिळणाऱ्या रकमेसाठी त्यांनी कधीही तगादा लावला नाही की, पुरस्कार मिळावेत यासाठी पाठपुरावा केला नाही. सध्या विविध पुरस्कारांसाठी सांस्कृतिक क्षेत्रातील पदे, पुरस्कार मिळविण्यासाठी सत्ताधारी राजकारण्यांकडे चकरा मारणाऱ्यांची संख्या वाढते आहे. या प्रवाहामध्ये अण्णा कधीही नव्हते. संस्कृती व लोककला यांच्यातील साम्यस्थळे, त्यातील सातत्य दाखविण्याबरोबरच समन्वयवादी दृष्टिकोन ठेवून त्यांनी लेखन केले.

डॉ. ढवळीकर म्हणाले, तत्कालीन कोंढाणा किल्ल्यावर नरसिंहाचे मंदिर होते. त्यामुळे राज्याभिषेकानंतर शिवरायांनी अनेक गड, किल्ल्यांची नावे बदलली आणि त्यात कोंढाण्याचे नाव सिंहगड करण्यात आले. हे अण्णांनी कागदपत्रांनिशी सिद्ध केले. अण्णांनी लिहिलेल्या श्री नरसिंहोपासना या ग्रंथाव्यतिरिक्त मराठीत नरसिंहावर स्वतंत्र आणि विस्तृत माहिती देणारे पुस्तक माझ्या पाहण्यात नाही, हेच अण्णांचे वेगळेपण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:34 am

Web Title: archaeologist dr dn dhanagare inaugurated dr ra chi dhere book
Next Stories
1 दिसली मोकळी जागा, की लाव फलक!
2 अजित पवारांना युतीची धास्ती
3 विद्यापीठाच्या साथीने पीएच.डी केंद्रासाठी शिक्षणसंस्थांच्या बारा भानगडी ?
Just Now!
X