महिलेने हाक मारल्याच्या होणाऱ्या भासाचे विधिवत पूजाअर्चेनंतर निराकरण?

पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे ‘खर्चिक’ काम सध्या सुरू आहे. एका अंधाऱ्या कोपऱ्यात काही मजुरांना महिलेने हाक मारल्याचा आवाज येत असल्याचा भास होतो, तो आवाज पुन्हा-पुन्हा येत राहतो. भीतीने सर्वाची गाळण उडते. सर्वाचेच धाबे दणाणले असल्याने काम करण्यास कोणी धजावत नाही. त्यामुळे काम बंद पडते. मात्र, विधिवत पूजाअर्चा केल्यानंतर सर्व काही ठीकठाक झाल्याच्या भावनेने पुन्हा काम सुरू होते.

पिंपरीतील संत तुकारामनगर भागातील आचार्य अत्रे रंगमंदिरातील अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. हा विषय कानावर आल्यानंतर, प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष रंगमंदिरात भेट दिल्यानंतर तेथे काम करणाऱ्या कामगारांकडे विचारणा केली असता, त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला. अत्रे रंगमंदिरात सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काही दिवसापूर्वी तेथे व्यासपीठाच्या वरच्या भागातील एका अंधाऱ्या कोपऱ्यात काम सुरू असताना, एक महिला ‘इकडे या’ अशी हाक मारत असल्याचा व तिच्या बांगडय़ांचा आवाज होत असल्याचा भास काहींना झाला. काम करणारे एकमेकांना पाहू लागले. कारण, सर्वानाच तसाच भास झाला होता. ‘हाकामारी’च्या बऱ्याच गोष्टी प्रचलित असल्याने, हा तसाच प्रकार असल्याच्या धास्तीने सर्वाची तारांबळ उडाली. त्यामुळे तेथून सर्वानी पळ काढला आणि थोडय़ाच वेळेत काम बंद पडले. तेथे काम करण्यासाठी कोणी जाण्यास तयार होत नव्हते. ही वार्ता संबंधितांमध्ये पसरली. वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या. पुढे विधिवत पूजाअर्चा करण्यात आली, त्यानंतर बंद पडलेले काम पूर्ववत सुरू झाले. ‘पूजाअर्चा होणे के बाद, सब कुठ ठीकठाक हो गया है, अब किसी औरत की आवाज नही आती है’ या शब्दात तेथे कामावर असणाऱ्या एकाने या घटनेस पुष्टी दिली. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या प्रकाराबद्दल अधिकृतपणे मात्र कोणीही काहीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून आले.