‘सेन्ट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’ने (सीसीआयएम) तयार केलेल्या आयुर्वेदाच्या नवीन ‘सेमिस्टर’ अभ्यासक्रमाचा मसुदा फुटल्यानंतर आयुर्वेदाच्या शिक्षकांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे. हा अभ्यासक्रम लागू झाल्यास आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातून आयुर्वेदशास्त्रच हद्दपार होईल, असा आक्षेप शिक्षक व्यक्त करत आहेत.
‘लोकसत्ता’ने या अभ्यासक्रमाच्या बदललेल्या रूपरेषेसंबंधीचे वृत्त दिले होते. काही आयुर्वेद शिक्षकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘बारावी शास्त्र शिकून आलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदातील संज्ञा कळण्यास वेळ जातो. सेमिस्टर पद्धतीत या विद्यार्थ्यांचे ज्ञान कच्चे राहण्याची शक्यता आहे. आयुर्वेदातील संहिता तोडून शिकवल्यास त्यादेखील अर्धवटच समजतील. आयुर्वेदातील पदार्थविज्ञान, इतिहास हे विषय काढून टाकण्यात आले असून संस्कृत भाषाही गरजेपुरतीच ठेवण्यात आली आहे. आयुर्वेदातील औषधी निर्माण, रसशास्त्र, द्रव्यगुण यांची जागा फार्माकोलॉजी आणि मटेरिआ मेडिका असे विषय घेणार असून आयुर्वेदाची वैशिष्टय़े भविष्यात पुसली जाण्याची शक्यता आहे. तसेच शल्यतंत्र, शालक्यतंत्र, स्त्रीरोग-प्रसूती अशा विषयांना पूर्वी असलेली आयुर्वेदाची स्वतंत्र तत्त्वे वगळून ‘सर्जरी’, ‘ईएनटी’, ‘गायनॅकोलॉजी’, ‘पिडिअॅट्रिक्स’ असे विषय ठेवण्यात आले आहेत. अशाने आयुर्वेद नावापुरताच शिल्लक राहील.’
ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सुहास परचुरे म्हणाले,‘हा अभ्यासक्रम घाईघाईने केल्यासारखा वाटतो. जुन्या अभ्यासक्रमातील अनावश्यक भाग गाळला जाऊ शकतो, पण आयुर्वेदाचे मूळ तत्त्व सोडता कामा नये. पूर्वी दीड वर्षांतही शारीररचना (अॅनाटॉमी) हा अभ्यासक्रम कसाबसा शिकवून होत असे, आता सेमिस्टर पद्धतीत तो कसा पूर्ण होणार? संहिता त्या-त्या विषयापुरती शिकवणे ही आयुर्वेदाची तोडमोड आहे.’
अभ्यासक्रमाचा मसुदा अंतिम नसून त्यावरील बरीचशी प्रक्रिया बाकी आहे, त्यामुळे आता होणारी चर्चा फोल आहे, असे मत सीसीआयएमच्या सदस्य डॉ. रागिणी पाटील यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ‘अभ्यासक्रमात अद्याप कोणत्याही विषयाचे गुण ठरवले गेलेले नाहीत. आयुर्वेदात संशोधन कमी पडत असून ‘मेडिकल बायोकेमिस्ट्री’, ‘संशोधन पद्धती’ हे विषय अभ्यासक्रमात गरजेचे होते, शिवाय त्यांचा प्राथमिक भाग शिकण्यास असेल. संहिता केवळ वर्गात शिकणे अपेक्षित नसून ज्या विषयात संहितेचा संबंध आहे त्या विषयाबरोबर संहितेचा तेवढा भाग शिकता येईल. संस्कृत हे विद्यार्थ्यांनी केवळ संहितांच्या अनुषंगाने शिकणे अपेक्षित असून संस्कृत पंडित तयार करणे हा उद्देश नसावा. अभ्यासक्रमाला नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशर्स कोर्स वर्क’ हा १५ दिवसांचा अभ्यासक्रमही तयार केला असून यात संस्कृतच्या प्राथमिक ज्ञानाचा भाग असेल. शारीररचना हा विषय आताही विद्यार्थी एका वर्षांतच शिकत आहेत.’
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2015 रोजी प्रकाशित
आयुर्वेद शिक्षकांमध्ये रंगली नवीन अभ्यासक्रमाची चर्चा!
आयुर्वेदाच्या नवीन ‘सेमिस्टर’ अभ्यासक्रमाचा मसुदा फुटल्यानंतर आयुर्वेदाच्या शिक्षकांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे.
Written by दया ठोंबरे
First published on: 16-12-2015 at 03:21 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurved teachers discuss new syllabus