बाळासाहेब विखे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले.  ते शनिवारी पुणे येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी चव्हाणांना बाळासाहेब विखे-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारण्यात आले असता, चव्हाणांनी काँग्रेस पक्ष त्याच्याशी सहमत नसल्याचे सांगितले. बाळासाहेब हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते त्यांचे मत व्यक्त करू शकतात. मात्र, त्यांच्या या वक्तव्याला माझे अनुमोदन नाही. त्यांचे पवारांविषयीचे मत व्यक्तिगत असून मला त्याबाबत अधिक भाष्य करायचे नसल्याचे सांगितले.
याशिवाय, अशोक चव्हाण यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमवीर राज्यामध्ये पाण्याचे समन्यायी वाटप होण्याची गरज व्यक्त केली. अन्यथा जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पाण्यावरून मोठे संघर्ष निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच पाणी साठवण्यासाठी सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जलयुक्त शिवार योजनेची बरीचशी कामे ई-निविदा न काढताच करण्यात आली आहे. ई-निविदेमार्फतच एखादे काम करण्याचा न्यायालयाचा आदेश योजनेच्यावेळी डावलण्यात आल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.