मावळ लोकसभेच्या लढतीचे चित्र अद्याप अस्पष्ट असून शिवसेना व राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार कोण, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांच्यापैकी नेमकी कोणाची लढत होईल, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारीचे धोरण ठेवलेल्या शिवसेनेने शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव यांना उमेदवारी दिली. मात्र, मावळात बाबरांना प्रतीक्षेत ठेवल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. गेल्या वेळी उमेदवारीसाठी बारणे शेवटपर्यंत स्पर्धेत होते. यंदाही त्यांनी बाबरांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. उमेदवारी कोणाला, यावरून ‘मातोश्री’ वर बराच खल सुरू आहे. राष्ट्रवादीकडून रिंगणात कोण राहील, हे स्पष्ट होईपर्यंत सेनेचा उमेदवार घोषित न करण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धोरण दिसते. राष्ट्रवादीकडून आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव निश्चित मानले जाते. मात्र, त्यांनी घातलेल्या अटीमुळे त्यांच्या उमेदवारीसमोर प्रश्नचिन्ह आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर न केल्यास राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारणार नाही, असे त्यांनी पक्षनेतृत्वाकडे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप बांधकामाविषयीचा निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता असून जगतापांच्या उमेदवारीविषयी संभ्रमावस्था आहे. जगताप जे बोलत आहेत, त्यावर ते ठाम राहिल्यास राष्ट्रवादीला मावळसाठी ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधावा लागणार आहे. सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवडमधून माजी महापौर संजोग वाघेरे यांच्याशिवाय लढण्यास फारसे कोणी इच्छुक नाही. गेल्या काही दिवसांपासून  मावळवरून शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. तथापि, प्रमुख उमेदवार गुलदस्त्यात असल्याने लढतीचे चित्र स्पष्ट होत नसल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या परिस्थितीचा फायदा घेत ‘आप’ चे उमेदवार मारुती भापकर यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. भापकर यांचे पिंपरी-चिंचवड हेच कार्यक्षेत्र असल्याने त्यांना मतदारांकडून प्रतिसादही चांगला मिळतो आहे. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मावळच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.