अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने अडचणीत आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या अटकेसाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत.  गुन्हा दाखल होऊन सहा दिवसांचा कालावधी लोटल्याने तृप्ती देसाईंना अटक कधी होणार असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीसह ४ जणांविरुद्ध विजय अण्णा मकासरे यांनी मारहाण आणि पैशाची मागणी केल्याची तक्रार दाखल केली आहे. तृप्ती देसाई आणि इतर ४ जणांवर अॅट्रॉसिटी, रस्ता अडवणे, मारहाण करणे, धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन सहा दिवसांचा कालावधी लोटला तरी तृप्ती देसाई यांना अटक न झाल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध असलेल्या तृप्ती देसाई पोलिसांना कशा सापडत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. याविषयी हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण वाईकर म्हणाले, आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. अटकेसाठी तीन पथके तयार करण्यात आली असून लवकरच पुढील कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तृप्ती देसाई आणि अन्य आरोपी चौकशीसाठी हजर होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर सर्वसामान्यांवर कारवाई करण्यात तत्परता दाखवणारे पोलीस तृप्ती देसाईंबाबत हीच तत्परता का नाही दाखवत असा सवाल उपस्थित होत आहे.