News Flash

‘चित्रबलाक’ पक्ष्यांची परतीच्या प्रवासाची लगबग सुरू

दरवर्षी युरोपीय देशांमधून आशिया खंडाकडे येताना चित्रबलाक पक्ष्यांचे भारतात अनेक ठिकाणी वास्तव्य असते.

विणीच्या हंगामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून इंदापुरात मुक्काम ठोकलेल्या चित्रबलाक पक्ष्यांची परतीच्या प्रवासासाठी लगबग सुरू झाली आहे.(छायाचित्र: जीवन, इंदापूर)

 

विणीच्या हंगामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून इंदापूर तालुक्यात मुक्काम ठोकलेल्या चित्रबलाक पक्ष्यांची परतीच्या प्रवासासाठी लगबग सुरू झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीला आकाशात काळ्या ढगांची चाहूल लागली आणि मोसमी पावसाच्या आगमनाचे संकेत मिळाले, की शेकडोंनी आलेले हे पाहुणे आपल्या पिलांसह परतीच्या प्रवासासाठी तयार होतात.

दरवर्षी युरोपीय देशांमधून आशिया खंडाकडे येताना चित्रबलाक पक्ष्यांचे भारतात अनेक ठिकाणी वास्तव्य असते. जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्यातदेखील हे पक्षी दरवर्षी वास्तव्याला येतात. त्यांची आश्रयस्थाने पक्षिमित्रांना आता परिचित झाली आहेत. इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारातील शासकीय कार्यालयांच्या गजबजाटातील जुनाट व उंच चिंचेची झाडे या ठिकाणाला चित्रबलाक पक्ष्यांची पहिली पसंती असते. इंदापुरातील भादलवाडी परिसरातील ब्रिटिशकालीन तलावातील झाडांवरही गेल्या दहा – बारा वर्षांपूर्वी चित्रबलाक पक्षी मोठय़ा संख्येने वास्तव्याला आले होते. मात्र, अवर्षणसदृश परिस्थितीमुळे पाण्याची उपलब्धता कमी असल्याने भादलवाडी तलावाकडे पक्ष्यांनी अनेकवेळा पाठ फिरविली असली, तरी इंदापुरातील चिंचेच्या झाडाचे ठिकाण आता त्यांचे माहेरघरच झाले आहे.

दरवर्षी नोव्हेंबर—डिसेंबर महिन्यात थंडी वाढली की चित्रबलाक पक्ष्यांचे आगमन उजनी जलाशयाच्या पाणवठय़ानजीक होते. तेथेच त्यांचा विणीचा हंगाम पार पडतो. मग सहा महिने या पक्ष्यांच्या गजबजाटाने उजनीचा परिसर खुलून जातो. पक्ष्यांच्या विणीच्या हंगामासाठी वसवलेल्या या वसाहतीला ‘सारंगार’ म्हणतात. सलग सहा महिने या सारंगाराला अनेक पक्षिमित्र, निसर्गमित्र भेट देतात. सध्या या पक्ष्यांची वीण झाली असून त्यांची पिले उड्डाणक्षम होण्यासाठी आकाशात विहार करत आहेत. या आकाशविहाराच्या सुंदर कवायती पाहणे हा इंदापूरवासीयांचा नित्यक्रम झाला आहे.

दरवर्षी उजनीच्या जलाशयावर हजारोंच्या संख्येने विविध जाती-प्रजातींचे पक्षी विविध देशांमधून वास्तव्याला येतात आणि पुन्हा मायदेशी जातात. परंतु, अलीकडे अनेक पक्षी वर्षभर वास्तव्य करू लागले आहेत. देश विदेशातील पक्ष्यांच्या या मांदियाळीत स्थानिक देशी कावळा, चिमण्यांची संख्या कमालीची घटली असून उजनी जलाशयावरील भिगवण ते कांदलगाव या ४० कि. मी. अंतरामध्ये कावळ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निरीक्षण वनस्पती व पर्यावरण अभ्यासक सागर काळे यांनी नोंदवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 4:03 am

Web Title: bird return journey started
Next Stories
1 जिल्ह्य़ासह पुणे विभागात टँकरची वाढती मागणी
2 प्राधिकरणाच्या विलीनीकरणावरून भाजपमध्ये संभ्रम?
3 शहरबात पिंपरी : पालकमंत्र्यांची पुन्हा-पुन्हा तीच आश्वासने
Just Now!
X