16 October 2019

News Flash

कॅन्टोन्मेंटमधील लढत भाजप-काँग्रेससाठी प्रतिष्ठेची

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघावर सन २०१४ पूर्वीपर्यंत सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व राहिले.

प्रतिनिधिक छायाचित्र

|| अविनाश कवठेकर

शिवसेना आणि रिपाइंची नाराजी भाजपपुढे डोकेदुखी:– काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि भारतीय जनता पक्षाचे सुनील कांबळे अशी लढत होत आहे. बागवे शहराध्यक्ष असल्यामुळे काँग्रेससाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील भाजपची ताकदही वाढली आहे. माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू थेट निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे भाजपसाठीही ही लढत प्रतिष्ठेची आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघावर सन २०१४ पूर्वीपर्यंत सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व राहिले. मात्र गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील परिस्थिती बदलली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून अनेक जण इच्छुक होते. मात्र पक्षाने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांचे बंधू, महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका कविता वैरागे यांचे पती डॉ. भरत वैरागे यांनी बंडखोरी केली.

भाजपने हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडावा, अशी आग्रही भूमिका त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र जागा वाटपात हा मतदारसंघ न सुटल्यामुळे सध्या रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तर सेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र शिवसेना आणि रिपाइंची नाराजी भाजप पुढे डोकेदुखी ठरू शकते.

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये २०१४ पूर्वी भाजपचा एकही नगरसेवक नव्हता. ही संख्या आता पाच झाली आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील महापालिकेतील भाजप नगरसेवकांची संख्या ९ अशी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे सन २०१४ मध्ये भाजपचे माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे हे या मतदार संघातून विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांचा त्यांनी पराभव केला होता, त्यामुळे भाजपची वाढलेली ताकद लक्षात घेता काँग्रेस भाजपला कसे आव्हान देणार याबाबत उत्सुकता आहे.

काँग्रेसचा हा पारंपरिक मतदार संघ आहे. त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसने हा मतदार संघ स्वत:कडे घेतला. मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मोहन जोशी यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही.

काँग्रेसकडून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी बंडखोरी केली. त्यांचे बंड शमविण्यात नेत्यांना यश आले.  सन २००९ मध्ये रमेश बागवे या मतदारसंघातून निवडून आले. मात्र सन २०१४ मध्ये ते भाजपचे दिलीप कांबळे यांच्याकडून चौदा हजार मतांनी पराभूत झाले. त्यामुळे आता शहराध्यक्ष असलेले रमेश बागवे यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली आहे.  सुनील कांबळे आणि रमेश बागवे यांना अनुक्रमे भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घराणेशाहीचे आरोप दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. त्यांच्याऐवजी अन्य उमेदवाराला संधी द्यायला हवी होती, असे कार्यकर्ते बोलत आहेत. तर काँग्रेसमध्येही बागवे यांच्या उमेदवारीवरून नाराजी आहे.काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत. मात्र पक्षाकडून त्याची दखल घेतली नाही, अशी प्रतिक्रिया नाराजांची आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेला रिपाइंला हा मतदारसंघ न मिळाल्यामुळे त्यांचीही नाराजी आहे.

प्रचारातील मुद्दे

केंद्राच्या संरक्षण खात्याअंतर्गत येत असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंटचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. पाण्याचा प्रश्न येथे कायम आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या योजना या भागात लागू होत नाहीत, अशीही तक्रार आहे. जीएसटीचा वाटा राज्य सरकारकडून मिळावा, अशी मागणीही होत आहे. विरोधकांकडून या मुद्दय़ांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. तर केंद्राच्या संरक्षण विभागाकडून पुणे कॅन्टोन्मेंटचे प्रश्न सोडविण्यात आल्याच्या मुद्दय़ाला भाजपकडून प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी खास बाब म्हणून निधी देण्यास दिलेली मंजुरी हा मुद्दाही भाजपकडून प्रचारात राहणार आहे.

First Published on October 10, 2019 4:19 am

Web Title: bjp congress vidhan sabha election fight akp 94