पुणे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतापदी गणेश बीडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष, खासदार अनिल शिरोळे यांनी तसे पत्र बीडकर यांना सोमवारी दिले.
महापालिकेच्या फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर अशोक येनपुरे यांची गटनेता या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता बीडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश स्तरावरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत बीडकर यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, तसेच एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी यांची बैठकीत प्रमुख उपस्थिती होती.
गणेश बीडकर गेली बारा वर्षे नगरसेवक म्हणून काम करत असून यापूर्वी स्थायी समितीचे आणि शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. या पूर्वी त्यांनी विविध समित्यांवर आणि नगरसेवक म्हणूनही पक्षाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. नवी जबाबदारी देखील ते समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास खासदार शिरोळे यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीत शिरोळे यांच्या विजयासाठी पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यात बीडकर यांचे स्थान अव्वल राहिले आहे. निवडणुकीच्या काळातील प्रचारयंत्रणा तसेच सभा, मेळावे आदी मोठय़ा कार्यक्रमांची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
सर्वाना बरोबर घेऊन काम – बीडकर
महापालिकेत कोणाच्याही विरोधाला न जुमानता पुणेकरांचे हित डोळ्यापुढे ठेवून काम करणार असल्याचे गणेश बीडकर यांनी सांगितले. विकासाच्या कामात भाजपचे सहकार्य राहील आणि सर्वाना बरोबर घेऊन काम करणार असल्याचेही ते म्हणाले.