बूथ सक्षमीकरणासाठी प्रयत्न

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शतप्रतिशत भाजप सत्तेत यावा या दृष्टीने शहरातील घराघरामध्ये पोहोचण्याचे प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाले आहेत. त्या दृष्टीने पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ‘रोड मॅप’ही तयार करण्यात आला असून मतदारसंघातील घराघरात पोहोचण्यासाठी प्रत्येक हजारी यादीला एक प्रमुख आणि वीस जणांचा संघ तयार केला जात आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती या संघाकडून मतदारांना दिली जात आहे.  विशेष म्हणजे बूथ यंत्रणा सक्षमीकरणाच्या या योजनेला तंत्रज्ञानाचीही जोड देण्यात आली आहे.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले. विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठही मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून आले. मात्र त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधात काही प्रमाणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससह शिवसेनेकडून सरकारविरोधात आंदोलने झाली.

येत्या दोन वर्षांत विधानसभा आणि लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती थेट लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही बूथ सक्षमीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजने’अंतर्गत पक्षाच्या केंद्रीय पातळीवरून ही योजना राबविण्यात येत आहे. पुण्यात या योजनेचे काम सध्या वेगात सुरू असून त्यातही पर्वती विधानसभा मतदार संघाने बाजी मारली आहे.

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाकडून विधानसभा मतदार संघनिहाय ‘विस्तारकां’ची नियुक्ती करण्यात आली आहे. विस्तारकांबरोबरच मतदार संघातील प्रत्येक हजारी यादीवर एका प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक यादीला वीस जणांचा संघ तयार करण्यात आला आहे.

त्या त्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचीच निवड यादी प्रमुख किंवा बूथ प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. तशी नियुक्ती करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची माहिती देण्यासाठी पक्ष पातळीवर ‘अ‍ॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेला कार्यकर्ता हा त्याच मतदार संघातील आहे का, याची माहिती देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रूम’मधून त्याची खातरजमा करण्यात येते.

विशेष म्हणजे त्याचे नाव मतदार संघात असेल तरच तसा संदेश संबंधितांना पाठविण्यात येतो. ोूथ प्रमुख आणि त्याच्या वीस जणांच्या संघाला त्या यादीतील दीडशे ते दोनशे घरे आणि आठशे ते नऊशे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रत्येकाच्या वाटय़ाला पंधरा ते वीस घरांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.

केंद्र सरकारची जनधन योजना, उज्ज्वला योजना, गॅस अनुदान, अटल पेन्शन योजना अशा विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येते. घरे, सोसायटय़ा किंवा गृहप्रकल्पांत पोहोचल्यानंतर त्यातील प्रमुख पदाधिकारी, नागरिक, विस्तारक आणि स्थानिक नगरसेवक यांचा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपही त्यासाठी तयार करण्यात येतो. त्याद्वारेही प्रभागातील किंवा मतदार संघात होणाऱ्या उपक्रमांच्या माहितीची देवाणघेवाण सुरू झाली आहे.

पर्वती विधानसभेचे शंभर टक्के काम

शहरातील पर्वती विधानसभा मतदार संघाने या रोड मॅपनुसार शंभर टक्के काम पूर्ण केले आहे. या विधानसभा मतदार संघासाठी विस्तारक म्हणून राजेश बाचल यांची तर हजारी प्रमुख म्हणून नगरसेवक रघू गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती गौडा यांनी दिली.