पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज देशातील पोलीस महासंचालक परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आगमन झाले. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे पुणे विमानतळावर आले होते. त्यानंतर प्रसार माध्यमाशी संजय काकडे यांनी संवाद साधला, त्यावेळी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लिन चीट देण्यात आली, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र येतील का? या प्रश्नावर काकडे म्हणाले की, राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पुन्हा एकत्र येतील असे मला वाटत नाही. तर राज्यात तीन पक्ष एकत्रित येऊन, सत्ता स्थापन झाली आहे. यामुळे हे सरकार टिकेल, त्यांना टिकवावं लागेल. अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
तसेच ते पुढे म्हणाले की, तर यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येत, सत्ता स्थापन केली. त्या प्रमाणे शरद पवार यांनी 1989 ला असं सरकार चालवलं असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पासून अनेक नेते मंडळी पक्षावर नाराज आहेत. पक्षातून बाहेर पडणार असल्याची अनेकांची नावे पुढे येत आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, एकनाथ खडसे हे एकमेव नाराज असतील. पण पंकजा मुंडे नाराज नसून कोणीही पक्ष सोडणार नाही. तसेच एकनाथ खडसे भ्रमीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची मुलगी पराभूत झाली हे त्यांना पचवता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.