संजय लीला भंन्साळी हे भव्यदिव्य सिनेमे काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमकथांच्या भव्य निर्मितीच्या माध्यमातून तरल आणि भावनोत्कट अविष्कार घडविणे हा त्यांचा मूळचा पिंड असल्याने नवनवीन प्रेमकथा त्यांना साद घालत असतात. त्या प्रेमकथांमध्ये समाजाशी द्वंद्व करून प्रेमासाठी हालअपेष्टा सहन करणे आणि प्रसंगी बलिदान देणे अशा आशयाचे कथानक असेल तर त्यांच्या कलात्मक संवेदनाना वेगळे स्फुल्लिंग चढ़ते. ही सृजनशीलतेची बाजू लक्षात घेतली तरी ऐतिहासिक आणि पूज्य चरित्रांना साकार करताना व्यक्तिस्वातंत्राच्या सीमारेषा ताणू नयेत, याचा विवेक पाळायलाच हवा. व्यक्तिस्वातंत्र्याला लोकशाहीत बंधन नसले तरी व्यक्तिस्वातंत्र्याला नियम असतात हे विसरून कसे चालेल? काही व्यक्ती, काही वास्तू, काही घटना या त्या त्या राष्ट्राच्या परंपरांचे, श्रद्धेचे, शौर्याचे, इतिहासाच्या मुहूर्तमेढीचे प्रथम स्तंभ असतात. या पूज्यस्थानांचे विद्रूपीकरण सहन न होणे हा अविवेकाचा, अंधश्रद्धेचा, प्रतिगामित्वाचा भाग असू शकत नाही.
वास्तविक आपला समाज अत्यंत सहिष्णू आहे. राम, श्रीकृष्ण, मारुती इत्यादी देवदेवतांवर विविध नाटकांतून प्रहसने सादर झाली आहेत. त्याचा आपण कलात्मक दृष्टिकोनातून खुल्यादिलाने स्वीकार केला आहे. परंतु, याच देवदेवतांची प्रक्षोभक चित्रे काढून एका चित्रकाराने व्यक्तिस्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला, तेव्हा त्याला समज द्यावी लागली.
चार्ली हेब्दो या फ्रेंच मासिकाने अशाच मर्यादांचे उल्लंघन केले. जगामध्ये लाखो विसंगतींचा आणि घटनांचा महापूर आलेला असताना नेमके यांना अश्लील विनोद करायला पूजनीय व्यक्तीच बऱ्या सापडतात!
बाजारीकरणाच्या रेटयात हे सिनेमावाले कसे वाहवत जातात, याचे ‘बाजीराव मस्तानी’ हे अजून एक उदाहरण. वास्तविक ऐतिहासिक स्त्रिया या ‘सुखविलासि सोडीना विनया’ अशा अत्यंत मर्यादाशील ,ऋजु आणि सात्विक. त्यांचे पडद्यावर इतिहासाच्या विपरीत चरित्र मांडायचे हे व्यक्तिस्वातंत्र्याचे सिमोल्लंघन झाले. त्या कलेच्या अविष्काराची आणि पूर्णत्वाची गरज ही सबब इथे बरोबर नाही. खरे म्हणजे या कलाकारांना जे जे सात्विक आणि खानदानी आहे त्याला बाजारू कधी करतो असे होते. माजघरातील अद्वितीय घरंदाज सौंदर्याला कमी कपड्यात कधी नाचवतो, असे होणे ही विकृत मानसिकता याच्या बूडाशी आहे, असे म्हणायला वाव आहे. क्रिकेटच्या घरंदाज कसोटी सामन्याचे बाजारू टी-२० मध्ये रूपांतर करणे, जुन्या अभिरुचिसंपन्न हिंदी गाण्यांना रिमिक्सच्या गलिच्छ चौकटीत बसवणे, ही त्याचीच काही उदाहरणे होत.
हे सौंद्र्यलोलूप भुंगे ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घ्यावे’ असा मर्यादाशील दृष्टिकोन न ठेवता त्या सुमनावरच झडप घालतात. आणि वर लालित्याच्या गप्पा मारतात. लालित्य म्हणजे औचित्यपूर्ण सौंदर्य. भावना दुखावणारे आणि इतिहासाचा विपर्यास करणारे सौंदर्य नुसते अनौचित्यपूर्णच नाही तर हिडीस आहे. खरेतर ते सौंदर्य म्हणता येणारच नाही, हे यांना सांगून पटणार नाही. कारण ते प्रचंड पुरोगामी आहेत आणि इतर सगळे बुरसटलेले ना!!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com