पुणे महापालिकेचे निलंबित मुख्य सुरक्षा अधिकारी रमेश वामन शेलार यांच्याकडे तब्बल दोन कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने शेलार व त्यांची पत्नी शारदा शेलार यांना अटक करून त्यांच्यावर विशेष न्यायालयात शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शेलार यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली होती. त्या वेळी त्यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे आढळल्यामुळे त्यांच्यासह पत्नीवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस उपअधीक्षक हेमंत भट यांनी केला. या तपासात शेलार यांच्या १९९५ ते २०१३ या कार्यकाळात त्यांच्या उत्पन्नाची माहिती घेण्यात आली. त्या वेळी २००९ मध्ये चार लाख, २०१० मध्ये ३० लाख ७८ हजार, २०११ मध्ये ४४ लाख ७४ हजार, २०१२ मध्ये ५२ लाख २३ हजार आणि २०१३ मध्ये ६५ लाख ६३ हजार रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे आढळून आले. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने शेलार यांच्यासह त्यांची पत्नी शारदा शेलार यांना अटक करून त्यांच्यावर विशेष न्यायालयात शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2015 रोजी प्रकाशित
महापालिकेचे निलंबित मुख्य सुरक्षा अधिकारी शेलारकडे दोन कोटींची बेहिशोबी मालमत्ता
या प्रकरणी लाचलुचपत विभागाने शेलार व त्यांची पत्नी शारदा शेलार यांना अटक करून त्यांच्यावर विशेष न्यायालयात शुक्रवारी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
First published on: 28-02-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bribe pmc security officer ramesh shelar acb