टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या वेडापायी तरुणाई कोणत्या पातळीवर जाईल काही सांगता येत नाही. पुण्यात अशाच एका चहा विकणाऱ्या तरुणाने टिक टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी लग्नातून कॅमेरा आणि लेन्स चोरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

१४ फेब्रुवारी रोजी आरोपी लग्नस्थळी केला. त्यानंतर लग्नातील फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची बॅगपॅक घेऊन लग्नातून पळ काढला. त्या बॅगेमध्ये फोटोग्राफरचे कपडे आणि त्याचे इतर साहित्य होते. त्यानंतर हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी ओरोपीनं हडपसर येथील लक्ष्मी लॉन येथून १ लाख रूपयांच्या कॅमेऱ्यासह वस्तूंची चोरी केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रतिक गव्हाणे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. त्यानं टिक टॉक व्हिडिओ बनवण्यासोबत फोटोग्राफी सुद्धा करण्याचे ठरवले. मात्र कॅमेरा घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने हे पाऊल उचलले.

घटनास्थळावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे प्रतिकला अटक करण्यात आली. प्रतिक कॅमेरा बॅग चोरी करून पळून जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसला. फुटेज पोलिसांनी आपल्या खबऱ्यांना दिले. त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.