राज्य शासनाच्या आणि पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत चालवली जाणारी अभियाने सध्या महाविद्यालयांमध्ये थंडावल्याचे चित्र दिसत आहे. राज्य शासनाने बंधनकारक केलेल्या ‘जागर जाणिवांचा’ या अभियानाला महाविद्यालयांकडून प्रतिसाद मिळाला नसून शहरातील फक्त ५५ महाविद्यालयांनी अहवाल पाठवले आहेत.
महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, औपचारिक शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये सहभागी होता यावे, अशा उद्देशाने उच्च शिक्षण विभागाकडून आणि विद्यापीठाकडून विविध अभियाने जाहीर केली जातात. मात्र, विद्यापीठाने जाहीर केलेल्या या अभियानांना महाविद्यालयांचा प्रतिसाद थंडावल्याचे दिसते आहे.
गेल्या वर्षी दिल्लीत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर मुलींना स्वसंरक्षणाची जाणीव व्हावी, महाविद्यालयांमध्ये स्त्री-पुरूष समानतेची बीजे रूजावीत अशा उद्देशांनी राज्य शासनानेच ‘जागर जाणिवांचा’ अभियान जाहीर केले होते. प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयाला या अभियानामध्ये सहभागी होणे बंधनकारक करण्यात आले होते. महाविद्यालयांनी या अभियानांतर्गत वर्षभर व्याख्याने, स्पर्धा, पथनाटय़े असे उपक्रम राबवायचे होते. महाविद्यालयांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाय योजना, विद्यार्थिनींचा सहभाग वाढावा म्हणून राबवलेले उपक्रम, विद्यार्थिनींच्या सुरक्षित वाहतुकीसाठी केलेले प्रयत्न, यांबाबतचा अहवाल शासनाला पाठवायचा होता. महाविद्यालयांनी राबवलेले उपक्रम आणि शासनाने नेमून दिलेले निकष यांनुसार मूल्यमापन करून चांगले काम करणाऱ्या महाविद्यालयाला पारितोषिक देण्याचेही शासनाने जाहीर केले. मात्र, या अभियानाला पुण्यातील महाविद्यालयांकडून थंड प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील दीडशे पेक्षा अधिक महाविद्यालयांपैकी फक्त पंचावन्न महाविद्यालयांनी या अभियानाचे अहवाल सादर केले आहेत.
‘जागर जाणिवांचा’ अभियानाप्रमाणेच विद्यापीठाच्या इतर अभियानांचीही अवस्था कमी-जास्त प्रमाणात सारखीच आहे. पुणे विद्यापीठाचा एनएसएस विभाग आणि विद्यार्थी कल्याण मंडळातर्फे पाच वर्षांपूर्वीच ‘समर्थ भारत अभियान’ जाहीर केले होते. उत्साहात सुरू झालेले हे अभियान आता पुरते थंडावले आहे. समर्थ भारतच्या माध्यमातून कोणतेही नवे उपक्रम राबवण्याऐवजी एनएसएसच्या माध्यमातून राबवण्यात येणारे विविध उपक्रम हे समर्थ भारत अभियानाचा भाग असल्याचे विद्यापीठाकडून भासवण्यात येत आहे.