26 September 2020

News Flash

बीड, तुळजापूरचे गोड, रसाळ कुंदन खरबूज बाजारात

प्रतिकिलोचा भाव १७ ते २५ रुपये

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दररोज ६० ते ७० टन खरबुजांची आवक; प्रतिकिलोचा भाव १७ ते २५ रुपये

उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर रसाळ फळांची आवक सुरू झाली आहे. गारवा देणाऱ्या  कलिंगड, खरबूज अशा रसाळ फळांना ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. बीड, तुळजापूरहून कुंदन जातीची रसाळ खरबुजे गुलटेकडीतील मार्केट यार्डात विक्रीसाठी दाखल झाली आहेत.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात तुळजापूर, बीड भागातून कुंदन जातीची खरबुजे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. बाजारात दररोज साठ ते सत्तर टन एवढी खरबुजांची आवक होत आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून खरबुजाला मागणी वाढली आहे. कुंदन जातीच्या खरबुजांचा प्रतिकिलोचा भाव १७ ते २५ रुपये किलो आहे. बाजारातील खरबूज विक्रेते सौरभ कुंजीर यांच्या गाळय़ावर दररोज खरबुजाच्या सतराशे ते दोन हजार प्लास्टिक जाळय़ा विक्रीसाठी दाखल होत आहेत.

कुंदन खरबुजांची लागवड तुळजापूर आणि बीड भागातील शेतक ऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर केली जात आहे. कुंदन जातीचे खरबूज गोड आणि रसाळ आहेत. कुंदन खरबुजाचा गर केशरी आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील फळविक्रेते आणि ज्यूसविक्रेत्यांकडून या खरबुजांना चांगली मागणी आहे. येत्या काही दिवसांत कुंदन खरबुजांची आवक आणखी वाढेल. पुण्यातील बाजारातून राज्यातील अन्य भागांत कुंदन जातीची खरबुजे विक्रीसाठी पाठवली जात आहेत. तुळजापूर परिसरातील वाणेगाव, जवळगा भागातून कुंदन खरबुजाची आवक सुरू आहे. साधारणपणे मे महिन्यापर्यंत खरबुजाचा हंगाम सुरू राहील, असे सौरभ कुंजीर यांनी सांगितले.  ते म्हणाले, बीड, तुळजापूर भागातून बॉबी जातीच्या खरबुजाची आवक होत आहे, मात्र बॉबी जातीच्या खरबुजापेक्षा कुंदन खरबूज गोड, रसाळ आहेत. बॉबी जातीच्या खरबुजाचे प्रतिकिलोचे दर दहा ते चौदा रुपये आहेत, मात्र  ग्राहकांकडून कुंदन खरबुजाला मागणी जास्त आहे. केशरी गर, गोड, रसाळ असल्याने कुंदन खरबूज ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 1:16 am

Web Title: cantaloupe in pune fruit market
Next Stories
1 उत्पन्न-खर्चाचा मेळ साधण्याचे आव्हान
2 पुण्यात तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ; मृतात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश
3 पुण्यात व्यावसायिकाची छातीत गोळी झाडून आत्महत्या
Just Now!
X